Jui Gadkari On Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी (Jui Gadkari) महाराष्ट्रातील घराघरांत पोहचत आहे. टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या या मालिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. या मालिकेत जुईने सायली हे पात्र साकारलं आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिने जोरदार कमबॅक केलं होतं. 


'ठरलं तर मग' या मालिकेत जुई गडकरी प्रमुख नायिका आहे. या मालिकेआधी तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. पण 'ठरलं तर मग' मालिकेसाठीचं तिचं सिलेक्शन खूपच गंमतीशीर आहे. पसारा आवरताना तिला ऑडिशनसाठी कॉल आला होता. त्यानंतर लगेचच तिने ऑडिशन पाठवलं आणि सिलेक्शन झालं होतं. 


'ठरलं तर मग' मालिकेसाठी जुई गडकरीची निवड कशी झाली? (Jui Gadkari Selection Process for Tharala Tar Mag)


एबीपी माझासोबत बोलताना जुई गडकरी म्हणाली,"मी घरी पसारा आवरत होते. त्यावेळी अचानक मला स्टार प्रवाहच्या क्रिएटिव्ह हेड अंजली टास्कर यांचा फोन आला. त्या म्हणाल्या,"स्टार प्रवाहवर अशी अशी एक मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी आम्ही तुझा विचार करत आहोत. तर तुला आवडेल का आता नवी मालिका करायला. त्यावेळी मी काहीही विचार न करता लगेचच त्यांना होकार दिला. पुढे त्यांनी मला मेकअप न करताच ताबोडतोब एक ऑडिशन पाठवायला लावलं.  त्यावेळी मी आंघोळदेखील केली नव्हती. गडबडीत तसंच एक ऑडिशन पाठवलं. त्यानंतर दहा मिनिटात त्यांचा कॉल आला आणि त्यांनी माझं सिलेक्शन झालं असल्याचं मला सांगितलं".  


'ठरलं तर मग' मालिकेच्या वेगळेपणाबद्दल बोलताना जुई गडकरी म्हणाली,"सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी लिहिलेली असते आणि ती कसाही मार्ग काढून आपल्यापाशी येते. या मालिकेच्या बाबतीतही काहीसं असंच म्हणता येईल. मनीध्यानी नसताना या मालिकेसाठी विचारणा झाली. मी स्वत:ला भाग्यवान समजतेय की इतक्या छान प्रोजक्टचा मला भाग होता आलं. मुंबईमध्ये जवळपास 7 ते 8 लोकेशन्सवर आम्ही शूट करत आहोत. कल्याणी इतकंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम प्रेक्षक सायली या नव्या व्यक्तिरेखेला देत आहेत". 


...अन् ठरवलं आता रडायचं नाही तर लढायचं


जुई म्हणते,"आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपण ठरवतो आता रडायचं नाही तर लढायचं. माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग मला आठवतो आणि तो म्हणजे मी अकरावीत नापास झाले होते. मुळात मला कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमधून शिकायचं नव्हतं. मला बीएमएम म्हणजेच बॅचलर ऑफ मास मीडिया मध्येच करिअर करायचं होतं. मात्र ते करण्यासाठी कोणत्याही एका शाखेमधून अकरावी आणि बारावी करणं महत्त्वाचं होतं. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मात्र अकरावीत नापास झाले. मात्र नापास झाल्यामुळे रडत न बसता मी त्यातून सावरले आणि जोमाने अभ्यासाला लागले. मनापासून अभ्यास केला आणि टीवायला असताना मी युनिव्हर्सिटीतून पहिली आले. हा प्रसंग मी कधीच विसरु शकत नाही".


संबंधित बातम्या


Jui Gadkari : "सत्याचा विजय होणार अन् प्रेक्षकांची इच्छाही"; जुई गडकरीने दिली आगामी भागाची हिंट; जाणून घ्या 'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची निवड कशी झाली?