पार्च्ड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तनिष्ठा दिग्दर्शिका लीना यादव आणि सहकलाकार राधिका आपटेसोबत 'कलर्स' वाहिनीवरील 'कॉमेडी नाईट्स बचाओ' कार्यक्रमात सहभागी झाली होती. कृष्णा अभिषेक, भारती सिंग यासारखे कलाकार असलेल्या या शोमध्ये 'रोस्ट' म्हणजेच पाहुण्यांची खिल्ली उडवली जाते.
'मला पार्च्ड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉमेडी नाईट्स बचाओ या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं होतं. मला रोस्टिंगची कल्पना दिली होती, तेव्हा अमेरिकन शो सॅटर्डे लाईव्ह प्रमाणे हलकाफुलका विनोद असेल, अशी माझी धारणा होती, त्यामुळे साहजिकच माझी उत्सुकता ताणली गेली.' असं तनिष्ठाने फेसबुकवर लिहिलं आहे.
'त्यानंतर माझ्या काळ्या रंगावर त्यांनी टिपणी करायला सुरुवात केली. तुला जांभूळ खूपच आवडत असेल ना? लहानपणापासून किती जांभळं खाल्लीस, असे हीन दर्जाचे विनोद त्यांनी सुरु केले. त्यांना माझी चेष्टा करण्यासाठी काळ्या रंगाशिवाय दुसरा एकही विषय मिळू नये, याचं मला आश्चर्य वाटतं. त्यानंतर अत्यंत वर्णद्वेषी कार्यक्रमात मी बसल्याचाही खेद वाटला.' असंही तनिष्ठाने पुढे म्हटलं आहे.
मी काहीतरी बरं घडेल, या हताश भावनेने तिथेच बसून राहिले, पण घोर निराशाच पदरी आली. अखेर मी आयोजकांना हे सांगितलं असता, त्यांनी 'रोस्टिंग' बाबत पूर्वकल्पना दिल्याचा बचाव केला. मी त्यांना रोस्टिंगचा अर्थ समजवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला, पण त्यांना समजलेलं दिसत नाही, असंही तनिष्ठाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
यापूर्वी लिझा हेडन, अनुष्का मनचंदा यासारख्या अभिनेत्रींनीही रोस्टिंगबाबत नाराजी दर्शवली होती. अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन यासारख्या कलाकारांनी याच फॉर्मॅटमुळे शोमध्ये येण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, कलर्स वाहिनीतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. तनिष्ठाला झालेल्या त्रासाबद्दल आपल्याला खेद असून, त्यासाठी क्षमा मागितल्याचं कलर्सतर्फे फेसबुकवर लिहिण्यात आलं आहे.