मुंबई : 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत डॉ. हाथीची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता कवी कुमार आझाद यांच्या अचानक एक्झिटमुळे मनोरंजन विश्वासोबत प्रेक्षकांनाही हादरा बसला आहे. मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा बालकलाकार भव्य गांधीने आठवणींना उजाळा दिला आहे.


भव्य गांधीने ट्विटरवरुन दोघांचा फोटो शेअर केला आहे. 'मी आता मालिका सोडलेली असली, तरी मला कायम त्यांची आठवण यायची. टप्पूसेनेचे सर्व हट्ट कवी कुमार पुरवायचे. ते खवय्ये होते. आम्ही एकत्र खूप खादाडी केली आहे. रोज जेवल्यावर मी त्यांच्या व्हॅनिटीमध्ये जायचो आणि हक्काने चॉकलेट मागायचो. त्यांच्याकडे चॉकलेट्सचा साठा असायचा.' असं टप्पूची भूमिका करणारा भव्य सांगतो.

कवी कुमार गेल्या आठ वर्षांपासून 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारत होता. सोमवारी वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याची प्राणज्योत मालवली.


'हा धक्का पचवणं खूप कठीण होतं. मी एका मीटिंगसाठी गेलो असताना आईने मला ही बातमी सांगितलं. क्षणभर मला काही सुचतच नव्हतं. ही किती धक्कादायक बातमी होती. माझ्या आयुष्यात भेटलेले सर्वात आनंदी व्यक्ती होते ते.. मी त्यांना कधी उदास पाहिलंच नाही. ते नेहमी हसतमुख असायचे आणि इतरांनाही हसवायचे.' असं टप्पू सांगतो.

कवी कुमार आझाद यांनी 2010 मध्ये शस्त्रक्रिया करुन 80 किलो वजन कमी केलं होतं. 'तारक मेहका का उल्टा चष्मा' मालिकेमुळे कवी कुमार आझाद घराघरात पोहोचले होते. तसंच आमीर खानच्या 'मेला' आणि फंटूश यासह काही सिनेमातही काम केलं होतं.