Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांना चाहते मालिकेतील व्यक्तीरेखेवरून ओळखतात. या मालिकेतील पोपटलालचे लग्न अनेक वर्षांपासून जुळत नसतं. मात्र, सगळ्या अडचणींवर मात केल्यानंतर त्याचा साखरपुडा होतो, पण तोही मोडला जातो. यावरून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. पोपटलालचे हे लग्न का मोडलं, या मागील कारण निर्माते असित कुमार मोदी यांनी (Asit Kumar Modi) सांगितले  आहे.


डॉ. हाथीमुळे मोडलं पोपटलालचे लग्न


बरीच वर्षे प्रेक्षक पोपटलालच्या लग्नाची वाट पाहत होते. पोपटलाल स्वतः खूप दिवसांपासून वधू शोधत होता. पोपटलालला मधुबालाच्या रूपाने जोडीदार मिळाली पण त्यांचा साखरपुडाच मोडतो. डॉ. हाथीमुळे हे लग्न मोडते. डॉ हाथी सांगतात की,  पोपटलाल आणि मधुबाला यांच्यात थॅलेसेमियाची लक्षणे आहेत. हा एक अनुवांशिक आजार आहे, ज्यामध्ये हिमोग्लोबिनची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. जी भविष्यात घातक ठरू शकते. या कारणाने पोपटलालचे लग्न होत नसल्याने चाहत्यांना धक्काच बसला. 


असित कुमार मोदी यांनी सांगितले कारण...


'तारक मेहता का...'चे निर्माते असितकुमार मोदी यांनी 'ई टाइम्स'शी बोलताना सांगितले की, पोपटलालचे लग्न न झाल्याने प्रेक्षक किती निराश झाले आहेत याची मला कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.   पण प्रेक्षकांनी शोच्या कथेवर लक्ष केंद्रित करावे आणि थॅलेसेमियासारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती कशी केली जात आहे हे पाहावे असे आवाहनही त्यांनी केले. 


मालिकेत, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मधुबालाला सांगतात की त्यांच्या भावी मुलांना थॅलेसेमिया होण्याची 25 टक्के शक्यता आहे. हा एक गंभीर आजार आहे. हे ऐकून पोपटलाल आणि मधुबाला जड अंतःकरणाने लग्न मोडतात. या शोमध्ये पोपटलालची भूमिका अभिनेता श्याम पाठकने साकारली आहे.


''पोपटलालच्या लग्नापेक्षा जनजागृतीचा संदेश महत्त्वाचा...''


असित कुमार मोदी यांनी सांगितले की, ''पोपटलालचे लग्न होत नसल्याने प्रेक्षक निराश झाले आहेत, परंतु त्यांनी दुसऱ्या बाजूला लक्ष केंद्रित करावे अशी माझी इच्छा आहे. या एपिसोडच्या माध्यमातून समाजाला एक मजबूत संदेश देण्याचा आमचा उद्देश होता. पोपटलालच्या लग्नापेक्षा थॅलेसेमियाबद्दलचा संदेश देणे महत्त्वाचे होते, असे माझे मत आहे. त्यांचे लग्न अन्य कोणत्या तरी एपिसोडमध्ये होऊ शकते. पण थॅलेसेमियाबद्दल हा महत्त्वाचा संदेश देणे आणि जनजागृती करणे आवश्यक होते, असेही मोदी यांनी सांगितले. 


''थॅलेसेमियाबद्दल लोकांमध्ये फारशी जागृती नाही''


असितकुमार मोदी याने सांगितले की, आपल्या देशातील बरेच लोक अनेक आजारांबाबत फारसे जागरूक नाहीत, म्हणून आम्हाला जागरूकता निर्माण करण्यासाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ची लोकप्रियता वापरायची होती. अशाप्रकारे जनजागृती करणे मला खूप उदात्त वाटले. शोचा निर्माता म्हणून मला प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नाही तर एक सामाजिक संदेशही द्यायचा होता. म्हणूनच आम्ही ते केले असल्याचे असित कुमार मोदी यांनी सांगितले. मला विश्वास आहे की लोक आमच्या प्रयत्नांचे कौतुक करतील.


मनोरंजन आणि विनोदाच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाचा संदेश देत आहोत. मला माहीत आहे की प्रेक्षक थोडे निराश झाले असतील, पण पोपटलाल जसे कधीच आशा गमावत नाहीत, त्यांनीही निराश होऊ नये. अखेर पोपटलाल लग्न करणार असल्याचे ही असितकुमार मोदी यांनी म्हटले.