TMKOC Gurucharan Singh :  'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सोढीची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंग गेल्या महिन्यात बेपत्ता झाले होते. मुंबईसाठी निघालेले गुरुचरण सिंह मुंबईत पोहचले नाही. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी गुरुचरण बेपत्ता झाला असल्याची तक्रार नोंदवली. दिल्ली पोलिसांनी गुरुचरण यांचा तपास सुरू केल्यानंतर अखेर 25 दिवसांनी पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. आता या प्रकरणावर गुरुचरण यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. 
  
अभिनेते गुरुचरण सिंह हे अचानकपणे बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. टीव्ही मालिका विश्वातही उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. दिल्ली पोलिसांनीदेखील कसून तपास सुरू केला. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात आले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. 


गुरुचरण सिंह यांनी काय म्हटले?


टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंह यांनी सांगितले की, याबाबत मी आताच बोलू शकत नाही. काही कायदेशीर औपचारिकता पूर्ण होणे बाकी आहे, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला नंतर तपशीलवार सांगू. तो म्हणाला, 'काहीही बोलण्यापूर्वी मला काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. एकदा या कायदेशीरबाबी पू्र्ण झाल्यास त्यानंतर मी भाष्य करेल असेही त्यांनी म्हटले. 


आणखी थोडा वेळ प्रतीक्षा करा...


गुरुचरण सिंह यांनी म्हटले की, माझ्या बाजूने ज्या काही  बाबी पूर्ण करायच्या होत्या, त्या पूर्ण केल्या आहेत. त्याबाबतची माहिती नंतर शेअर करेल. आता, माझ्या वडिलांना काही प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत. सध्या निवडणुकांचा काळ सुरू असल्याने आम्ही आणखी थोडा वेळ घेणार आहोत. त्याशिवाय, कोर्टातील काही कायदेशीर बाबी पू्र्ण करायच्या आहेत. 


आपल्या प्रकृतीबाबत गुरुचरण सिंह यांनी सांगितले की, आता आपली प्रकृती ठीक असून काही दिवस डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. आता त्रास जाणवत नाही. काही वेळेस थकवा जाणवत होता. पण आता प्रकृती बरी असून आपण काळजी घेत असल्याचे गुरुचरण यांनी सांगितले. 


लवकरच सत्य सांगणार...


मागील महिन्यात कोणालाही कोणतीही कल्पना न देता 26 दिवस कुठे होता, असा प्रश्न गुरुचरण यांना विचारण्यात आला. त्यावर गुरुचरण यांनी सांगितले की, याबाबतही मी लवकरच सांगणार आहे. मी तो निर्णय का घेतला, कुठे होतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे गुरुचरण सिंह यांनी सांगितले.