Superstar Singer 2 Winner: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘सुपरस्टार सिंगर 2’चा (Superstar Singer 2) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. स्पर्धक मोहम्मद फैज (Mohammad Faiz) याने या पर्वाची ट्रॉफी जिंकली आहे. सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर 2’ला अखेर तीन महिन्यांच्या तगड्या स्पर्धेनंतर आपला विजेता (Superstar Singer 2 Winner) मिळाला आहे. जोधपूरच्या मोहम्मद फैजने या शोचे विजेतेपद जिंकत लोकांच्या प्रेमासोबत 15 लाख रुपये बक्षीस म्हणून जिंकले आहेत. फैज, मणि, प्रांजल बिस्वास, आर्यनंद आर बाबू, ऋतुराज आणि साईशा गुप्ता हे या शोच्या टॉप 6 फायनलिस्टमध्ये सामील होते. महान्तिं सोहळ्यात या स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळाली.
मोहम्मद फैज हा ‘इंडियन आयडॉल 12’ची स्पर्धक अरुणिता कांजीलालच्या टीममधून होता. ‘इंडियन आयडॉल 12’चे विजेतेपद अरुणिता जिंकू शकली नसली, तरी तिने मोहम्मद फैज याच्या माध्यमातून आपले जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
टॉप 6 फायनलिस्टमध्ये रंगली चुरस
‘सुपरस्टार सिंगर 2’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या टॉप 6 फायनलिस्टमध्ये पवनदीप राजनच्या टीमचे 2 स्पर्धक साईशा आणि प्रांजल यांचाही समावेश होता. तर, मणी आणि ऋतुराज हे सलमान अलीच्या टीममधून होते. आर्यनंद हा मोहम्मद दानिश यांच्या टीममधून होता. 14 वर्षीय मोहम्मद फैज (Mohammad Faiz) या सगळ्यांना पराभूत करत शोचा विजेता ठरला आणि ट्रॉफीसह त्याने 15 लाखांचे रोख बक्षीसही जिंकले. तर, मणीला या पर्वाचा उपविजेता घोषित करण्यात आले. त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
जिंकली प्रेक्षक आणि परीक्षकांची मनं
विजेत्या मोहम्मद फैजला ट्रॉफीसोबतच 15 लाखांचा धनादेशही मिळाला आहे. ‘सुपरस्टार सिंगर 2’चा हा विजेता आपल्या बक्षीसाची रक्कम पालकांना सुपूर्द करणार आहे. मोहम्मद फैज याला ‘सुपरस्टार सिंगर 2’चे परीक्षक-गायक हिमेश रेशमिया यांनी 'युथ सेन्सेशन' ही पदवी देखील दिली होती. प्रत्येक एपिसोडमध्ये जोधपूरचा हा चिमुकला प्रतिभावान गायक परीक्षकांची आणि प्रेक्षकांची मने जिंकताना दिसला होता. शोमध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटीही फैज (Mohammad Faiz) याच्या आवाजाने खूप प्रभावित झाले होते.
विजयानंतर फैज म्हणतो...
या शोदरम्यान अनेक सेलिब्रिटींनी त्याचे खूप कौतुक केले होते. आपल्या विजयानंतर पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत फैज म्हणाला की, जेव्हा माझं नाव विजेता म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा माझ्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत मी आनंदाश्रू पाहिले. मला या पर्वात अनेकांकडून कौतुकाचे आणि शिकवण बोल मिळाले. मी माझ्या या विजयाने हुरळून न जाता भविष्यात आणखी काय चांगले करता येईल, याकडे लक्ष देणार आहे.
हेही वाचा :