Subodh Bhave :  सध्या छोट्या पडद्यावर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  छोट्या पडद्यावर आता अभिनेता सुबोध भावेची (Subodh Bhave) महत्त्वाची भूमिका असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर छोट्या पडद्यावर व्यक्तीरेखेसाठी होणार आहे. एआयच्या वापरावर काही कलाकारांनी टीका केली होती. या टीकाकारांना अभिनेता सुबोध भावेने सुनावले आहे. सोशल मीडियावरचा शहाणपण मला शिकवू नका असेही त्याने ठणकावले.


सोनी मराठी वाहिनीवर  ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका येत्या 8 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सुबोध भावे दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. या दोन्ही भूमिकांमध्ये 20 ते 25 वर्षांचे अंतर आहे. महाविद्यालयीन जीवनातील सुबोध भावेच्या व्यक्तीरेखेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सुबोधच्या व्यक्तिरेखेसाठी एआयच्या वापराऐवोजी एखाद्या नवख्या तरुण कलाकाराला काम दिले पाहिजे असा सूर काहींचा होता. त्यावर सुबोध भावे याने आपली सडेतोड भूमिका मांडली आहे.


सुबोध भावेने  ‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना  म्हटले की, “AI च्या वापरामुळे कुणाच्या पोटावर आणलेला नाही. लहानपण मीच करायचं असं जर ठरवलं असतं तर कुणाला घेणार होतो. दुसरं म्हणजे सध्या मराठीत 35 मालिका सुरू आहेत. त्यातील एका मालिकेत मी काम करत आहे. आता माझ्यामुळे 34 मालिकांमधील कलाकारांच्या पोटावर पाय आला नाही ना असा सवालही त्याने केला. सुबोध भावे यांनी पुढे म्हटले की, मीदेखील एक अभिनेता आहे, त्यामुळे जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मी अभिनय करत  राहणार आहे”. 


सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका...


सुबोध भावेने मुलाखतीत पुढे म्हटले की, मालिकेतील एआयच्या वापरामुळे कलाकारांच्या पोटावर पाय वगैरे हा इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरचा शहाणपणा मला शिकवू नका. मीदेखील अनेक गोष्टींचा सोडून, अनेक गोष्टींचा त्याग करुन इथे कलाकार म्हणून आलो आहे. माझे हजार व्यवसाय नाहीत असेही त्याने टीकाकारांना सुनावले. माझं दुकान पण आहे. बिल्डर पण आहे आणि राजकारणातूनही मला पैसा येत आहे असं नाही. माझं पोट, माझं रक्त आणि माझा जीव फक्त अभिनयावरच आहे त्यामुळे मी हेच करत राहणार आहे. त्यामुळे नवीन कलाकारांच्या पोटावर पाय हा शहाणपणा दुसऱ्या कुणाला तरी शिकवा. मला शिकवू नका असेही  सुबोध भावे याने सुनावले.