बिग बॉसचं लोणावळ्यातील शूटिंग बंद होणार?
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2017 11:22 AM (IST)
पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवत घरातील सांडपाणी थेट नदीत सोडण्यात आल्याचा आरोप बिग बॉसवर ठेवण्यात आला आहे.
लोणावळा : एकापेक्षा एक स्पर्धक आणि अजब टास्कमुळे कलर्स टीव्हीवरील 'बिग बॉस'चा अकरावा सीझन चर्चेत आहे. आता 'बिग बॉस' शो पुन्हा वादात अडकला आहे. शोच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करा, अशी शिफारस लोणावळा नगरपरिषदेतर्फे करण्यात आली आहे. लोणावळास्थित बिग बॉसच्या घरासाठी अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवत घरातील सांडपाणी थेट नदीत सोडण्यात आल्याचा आरोप बिग बॉसवर ठेवण्यात आला आहे. तीन वर्ष होऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. तसंच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर उभारलेला नाही. याशिवाय अग्निशमन यंत्रणा तसंच कर्मचारी इथे नाहीत. त्यामुळे बिग बॉसच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करावा, अशी शिफारस लोणावळा नगरपरिषदेच्या चौकशी अहवालात करण्यात आली आहे.