Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेत स्वरा आणि वैदेही म्हणजेच अवनी तायवाडे आणि उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) यांचे सीन्सदेखील चांगले रंगत आहेत. पडद्यावरच्या या मायलेकी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या मायलेकी झाल्या आहेत. उर्मिला आपल्या लेकीप्रमाणेच म्हणजेच जिजाप्रमाणे स्वराची काळजी घेते. इतक्या लहान वयातही स्वरामध्ये असलेला समजूतदारपणा उर्मिलाला विशेष भावतो. दोघींमधली हीच भन्नाट केमिस्ट्री मालिकेत नवे रंग भरत आहे. उर्मिलाची लेक म्हणजेच जिजा देखिल बऱ्याचदा तुझेच मी गीत गात आहेच्या सेटवर जात असते.


सुरुवातीला आपली आई या कोणत्या नव्या मुलीचे लाड करत आहे, असं जिजाला वाटायचं. पण आता जिजा आणि स्वरामध्येही छान गट्टी जमली आहे. शूटिंगमधून वेळ मिळाला की या दोघींचीही सेटवर धमाल सुरू असते. खरंतर जिजामुळेच मला स्वराची आई साकारणं शक्य झाल्याचं उर्मिला सांगते. लहानग्यांसोबत लहान कसं व्हायचं हे मी जिजामुळेच शिकलेय. त्यामुळे सेटवरच्या या लेकीसोबत माझी खास गट्टी जमली आहे.


उर्मिला कोठारेने तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक केलं आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारत आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना ऊर्मिला म्हणाली, खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येत आहे. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. 


गाण्याच्या दुनियेत हरवून जाणाऱ्या स्वराची भूमिका बालकलाकार अवनी तायवाडेने साकारली आहे. अवनी मुळची नागपूरची आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेसाठी अवनीने  ऑडिशन दिली आणि तिची निवडही झाली. सेटवर अवनी सर्वांचीच लाडकी आहे. मालिकेतली आई म्हणजेच ऊर्मिला कोठारेसोबत तिची छान गट्टी जमून आली आहे. आई-मुलीचे इमोशनल सीन अवनी अगदी सहजरित्या साकारते.


संबंधित बातम्या


Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका फेम स्वराविषयी 'या' खास गोष्टी जाणून घ्या


Tujhech Mi Geet Gaat Aahe : 12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'तुझेच मी गीत गात आहे...' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस