मुंबई : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी अभिजीत बिचुकलेला सेटवरुन त्याला अटक केली. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजेच अटकेच्या वेळी बिचुकलेने कोणताही विरोध केला नाही.


चेक बाऊन्स प्रकरणात सातारा कोर्टाने बिचुकलेविरोधात वॉरंट जारी केलं आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत दाखल झाले. बिग बॉस मराठीचा सेट मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आहे. त्यामुळे सातारा पोलिसांनी अटकेच्या कारवाईसाठी मुंबई पोलिसांची मदत मागितली होती.

अटक केल्यानंतर बिचुकलेला उद्या सातारा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकले स्पर्धेत कायम राहणार की इथेच त्याचा घरातील प्रवास संपणार, तसंच यावर कलर्स मराठी वाहिनी काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

दरम्यान, अभिजीत बिचुकलेने बिग बॉसच्या घरातील सहस्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसलेला शिवीगाळ केली होती. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या 24 व्या भागात हा प्रकार घडला होता. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेला शोमधून हकालपट्टी करा, अशी मागणी  केली होती.

अभिजीत बिचुकले हे 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेला एकमेव राजकीय नेता आहे. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत असतो, आता या नव्या वादाची त्यात भर पडली आहे.

कोण आहे अभिजीत बिचुकले?

- साताऱ्यातच मागासवर्गीय घरात बिचुकलेचा जन्म झाला
- घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा  परंपरागत व्यवसाय
- बिचुकले सातारा नगरपालिकेत कर्मचारी होता
- पण सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला
- त्यानंतर उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन
- त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी जाहीर करणे
- आणि त्यानंतर ऐनवेळी माघार घेणे हे प्रकार सुरु केले
- उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली
- पण कधीही 2 हजार मतांच्या वर त्याची मजल गेली नाही
- यंदा त्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता
- इतकंच काय त्यानं आपल्या पत्नीलाही निवडणुकीत उभं केलं
- अभिजीत बिचुकलेवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत

संबंधित बातम्या

'बिग बॉस'च्या शाळेत इव्हेंच्युअली बिचुकले गुरुजी देणार इंग्रजीचे धडे

मी फक्त एकालाच घाबरतो, अभिजीत बिचुकलेला : उदयनराजे भोसले

बिचुकलेंना 'बिग बॉस'मधून बाहेर काढा, भाजपच्या माजी नगरसेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Big Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात बिचुकले का बिथरले?