मुंबई : 'ससुराल सिमर का' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री दीपिका कक्करचा. लग्नानंतर इस्लाम धर्मात परिवर्तन केल्यामुळे दीपिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावर अखेर दीपिकाने मौन सोडलं आहे.
पती शोएब इब्राहिमचा धर्म स्वीकारल्याची कबुली दीपिकाने दिली आहे. दीपिकाचं नामकरण आता 'फैझा' असं झालं आहे.


'जे खरं आहे, ते खरं आहे. मी धर्मपरिवर्तन केलं हे खरं आहे, पण का आणि कधी केलं, याबाबत चर्चा व्हावी असं मला वाटत नाही. मला वाटतं, हा अत्यंत वैयक्तिक मुद्दा आहे. मीडियासमोर खुलेआमपणे हा विषय चघळावा, अशी माझी अजिबात इच्छा नाही. प्रेक्षकांसाठी आम्ही कलाकार असतो आणि प्रत्येक गोष्ट शेअर करतो. आम्ही आनंदाच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगतो. पण ही माझी पर्सनल स्पेस आहे आणि कोणालाही त्यामध्ये डोकवण्याचा अधिकार नाही. हे खरं आहे आणि मी नाकारतच नाही. मी हे केल्याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे. मी स्वतःसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी हा निर्णय घेतला' असं दीपिकाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

22 फेब्रुवारीला दीपिका कक्करने अभिनेता शोएब इब्राहिमसोबत निकाह केला. हळद, मेहंदी, संगीत असा विवाहसोहळा पार पडला. शोएबच्या गावी मौदाहामध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थित दोघांचा निकाह झाला. त्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रमंडळींसाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं.

ससुराल सिमर का मालिकेत दीपिका आणि शोएब यांनी एकत्र काम केलं होतं. शोएबने काही महिन्यांतच मालिका सोडली, तर दीपिकाने अनेक वर्ष मालिकेत भूमिका केली. मात्र या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या वर्षी 'नच बलिए' या सेलिब्रेटी कपल डान्स रिअॅलिटी शोमध्येही दोघं सहभागी झाले होते. या शोमध्येच शोएबने दीपिकाला लग्नाची मागणी घातली होती.