मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या 'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सामान्य प्रेक्षकच नव्हे, तर बॉलिवूडमधील सुपरस्टारनाही या शोची मोहिनी पडली असून, चक्क दबंग अभिनेता सलमान खानने 'चला हवा...'च्या सेटवर हजेरी लावली.

 
'सुलतान' चित्रपटाच्या निमित्ताने सुपरस्टार सलमान कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. आतापर्यंत 'चला हवा येऊ द्या'मध्ये शाहरुख खान, सोनम कपूर-शेखर रावजिवानी, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. त्यात आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे.

 
बुधवारी गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये या कार्यक्रमाचं शूटिंग पार पडलं. यावेळी दोन एपिसोड शूट झाले असून 4 आणि 5 जुलैला या भागांचं प्रक्षेपण होणार आहे.


 

शाहरुख-विद्यानंतर सलमानही 'चला हवा येऊ द्या'मध्ये


 

 

चला हवा येऊ द्याच्या टीम मधील डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि नव्याने सहभागी झालेले रमेश वाणी, शशिकांत केरकर यांनी धमाल उडवून दिली. सर्वांनी सलमानसोबत सेल्फीही काढला असून या भागात काय रंगत येणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.