Salman Khan, Bigg Boss : टीव्हीचा वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) लवकरच नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोचा होस्ट सलमान खान या सीझनसाठी 15व्या सीझनपेक्षा तिप्पट जास्त फी आकारणार आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. ‘बिग बॉस’च्या नव्या सीझनची घोषणा होताच या शोशी संबंधित अनेक चर्चांचा फेरा सुरू झाला आहे. स्पर्धकांनंतर आता शोचा होस्ट सलमान खानशी संबंधित माहिती समोर येऊ लागली आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये ‘बिग बॉस 16’साठी सलमान किती फी आकारणार, याचा खुलासा करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, सलमान खान 'बिग बॉस 16' साठी वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF: Chapter 2' च्या बजेटपेक्षा दहापट जास्त फी आकारणार आहे. रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, सलमान खान या नव्या सीझनसाठी सुमारे 1000 कोटी रुपये इतके मानधन घेणार आहे.
सलमान खानने बिग बॉसच्या 15व्या सीझनसाठी 350 कोटी रुपये फी आकारली होती. तर, आता त्याने नव्या सीझनसाठी तिप्पट फी मागितली आहे. म्हणजेच 'बिग बॉस 16'साठी अभिनेता सुमारे 1000 कोटी रुपये आकारणार आहे.
‘या’ स्पर्धकांची नावे चर्चेत!
बिग बॉसच्या नव्या सीझनच्या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘बिग बॉस 16’च्या अपडेटमध्ये शोच्या प्रीमियरच्या तारखेपासून ते सलमान खानच्या फीपर्यंत अनेक बातम्या चर्चेत आल्या आहेत. आता या शोच्या काही संभावी स्पर्धकांची नावे देखील समोर आली आहेत. यामध्ये मुनव्वर फारुकी, कनिका मान, ट्विंकल कपूर, विवियन डिसेना, फैसल शेख, शिविन नारंग आणि फरमानी नाज यांच्या नावांचा समावेश आहे. हे सर्व सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे तर, वादामुळे चर्चेत आले आहेत.
'बिग बॉस 16'चा प्रोमो होणार आऊट
बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून 'बिग बॉस 16'चे सूत्रसंचालन करत आहे. यंदाच्या पर्वातदेखील भाईजानचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सलमानने 'बिग बॉस 16'च्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे लवकरच 'बिग बॉस 16'चा प्रोमो आऊट होणार आहे. बिग बॉसचे 16 वे पर्व सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार असल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 1 ऑक्टोबर 2022 रोजी कलर्स चॅनलवर या बहुचर्चित कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. निर्माते लवकरच अधिकृतरित्या यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत.
संबंधित बातम्या