Ratris Khel Chale Shevanta : छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale ) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेचा तिसरा सिझन सध्या सुरू आहे.  'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंता आणि अण्णा नाईक या जोडीला प्रेक्षकांची विसेष पसंती मिळाली. तसेच मालिकेतील दत्ता, माधव, पांडू आणि वच्छी या व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. शेवंता ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (apurva nemlekar) तर अण्णा नाईक ही भूमिका  माधव अभ्यंकर यांनी साकारली आहे.  नुकतीच अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून तिने रात्रीस खेळ चाले ही मालिका सोडण्याच्या निर्णया मागिल कारण तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे. 


अपूर्वाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहीले, 'शेवंता बस नाम ही काफी है, पण कधी कधी फक्त नाव पुरेस नसतं. शेवंता म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली. एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका साकारताना मजा आली आणि समाधानही वाटलं.'  पुढे पोस्टमध्ये अपूर्वाने लिहीले,  ही मालिका सोडण्याचा निर्णय मला का घ्यावा लागला? असं मला प्रेक्षक विचारत होते. त्यामुळे माझी वैयक्तिक जबाबदारी आहे की मी मालिका का सोडली हे प्रेक्षकांना सांगावे.'






अपूर्वाने पुढे पोस्टमध्ये सांगितले की, 'प्रोडक्शन हाऊसकडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्या सिझनसाठी आम्हाला तुमचे 5 ते 6 दिवसच लागणार आहे. म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनेलकडून मला आणखी एक शो देण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु ५ ते ६ महिने झाले अद्याप ते आश्वासन पाळलं गेले नाही. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे.' पोस्टमध्ये अपूर्वाने सांगितलं की तिच्या कामचा मोबदला तिला मिळाला नाही म्हणून तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. 






अपूर्वा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अपूर्वाने शेवंता ही भूमिका साकारताना तिला आलेल्या अनुभवाबद्दल देखील पोस्टमधून सांगितले आहे.