Rang Maza Vegla : महाराष्ट्रातली नंबर वन मालिका रंग माझा वेगळाला (Rang Maza Vegla) प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून लवकरच बालकलाकार मैत्रेयी दाते कार्तिकीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मैत्रेयीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. मैत्रेयीची ही आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी अभिनय अकादमीमध्ये तिचा प्रवेश घेतला. मैत्रेयीने बऱ्याच जाहिराती आणि बालनाट्यांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच मैत्रेयी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत असून तिला चित्रकलेचीही आवड आहे. 


मैत्रेयीची रंग माझा वेगळा ही आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र तिच्या ओळखीचं आहे. कार्तिकी आणि दीपिकाची जोडी तर तिला खूपच आवडते. आपलं आवडीचं पात्र साकारायला मिळणार हे कळल्यावर तिला अतिशय आनंद झाला. सेटवरही मैत्रेयीचं खास स्वागत करण्यात आलं. दीपिकाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या चिमुकल्या स्पृहासोबत तर तिची पहिल्या दिवासापासून छान गट्टी जमली आहे. शूटिंगमधल्या फावल्या वेळेत अभ्यास आणि मनसोक्त खेळणं हा त्यांचा दिनक्रम झाला आहे. त्यामुळे मैत्रेयीसाठी हा मालिकेचा सेट नसून दुसरं घरच आहे. पडद्यामागची दोघींची ही खास मैत्री पडद्यावरही नक्कीच दिसेल.






सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर तुम्ही रंग माझा वेगळा ही मालिका पाहू शकता. एका मध्यमवर्गीय घरातील उपेक्षित आणि सावळ्या रंगाच्या दीपा या मुलीची कथा या मालिकेत दाखवण्यात आली होती. तिच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत तिने नेहमीच यश मिळवले आहे, असं मालिकेच्या कथानकामध्ये दाखवण्यात आलं आहे.  अभिनेत्री रेश्मा शिंदे, अभिनेता आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर हे कलाकार या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारतात. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 


हेही वाचा:


Marathi Serial : 'या' आठवड्यात कोणती मालिका ठरली प्रेक्षकांच्या आवडती? जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट