Rama Raghav Marathi Serial Latest Update : 'रमा राघव' (Rama Raghav) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे. रघा आणि राघव एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. राघवमुळे रमाला नवीन आयुष्य मिळालं आहे. आता रमा आणि राघवपैकी प्रेमाची कबुली कोण देणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
'रमा राघव' मालिकेचा रंगणार विशेष भाग
'रमा राघव' या मालिकेचा आता विशेष भाग रंगणार आहे. हा विशेष भाग प्रेक्षकांना 25 मे 2023 रोजी रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. विशेष भागात रमा किंवा राघव प्रेमाची कबुली देताना दिसतील. 'रमा राघव'चा विशेष भाग पाहण्यासाठी मालिकाप्रेमी उत्सुक आहेत.
'रमा राघव' मालिकेच्या प्रोमोमध्ये काय आहे? (Rama Raghav Marathi Serial Promo)
'रमा राघव' या मालिकेत सध्या रमाची आई लावण्याने पुरोहितांना धडा शिकवून रमाला पुन्हा आपल्या घरी आणण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी तिचा जाहीर अपमान करणाऱ्या श्रुतीच्या आयुष्यात एक लफंगा मुलगा आणून तिच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याची आणि पर्यायाने पुरोहितांच्या संस्कारांची लक्तरे वेशीवर टांगण्याची लावण्याची खेळी आहे.
आईची ही खेळी पुरोहितांच्या बाजूने रमा उधळून लावण्यात यशस्वी ठरणार का? की आईमुळे रमा अडचणीत येणार? राघवला जेव्हा हे कळेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल याची उत्कंठावर्धक गोष्ट मालिकेत उलगडत असून श्रुतीच्या प्रकरणाचा तपास करण्याआधी रमा राघव देवाचे आशीर्वाद घेतात. तेव्हा कौल कसा लावला जातो, हे राघव रमाला समजावून सांगतो. तेव्हा रमा ती प्रेमात पडली आहे का? याचे उत्तर देवबाप्पाकडे मागते. कौल होकारार्थी असल्याने या दोघांपैकी कोण आधी प्रेमाची कबुली देणार या प्रश्नाचे उत्तर रमाच्या बाजूने एक घर पुढे सरकते.
'रमा राघव' या मालिकेतील खट्याळ रमा आणि प्रेमळ राघव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दोन अतिशय विरुद्ध कौटुंबिक वातावरणातून आलेल्या रमा आणि राघव यांच्यातील संघर्षाची आणि त्यातून पुढे फुलणाऱ्या प्रेमाची तिखट गोड गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. आयुष्यात आदर्श, तत्त्व, मूल्य यांचं महत्त्व नव्या पिढीला हलक्या फुलक्या रितीने पटवून देण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला जात आहे.
संबंधित बातम्या