मुंबई : गेली सहा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारी 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'पुढचं पाऊल' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हर्षदा खानविलकर यांनी साकारलेली 'अक्कासाहेब सरदेशमुख' ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा घराघरात पोहचली आहे.
सहा वर्षांहून जास्त काळ चाललेल्या या मालिकेचे दोन हजारपेक्षा जास्त एपिसोड्स झाले आहेत. मात्र शेवटचा एपिसोड कधी टेलिकास्ट होणार, याविषयी अद्याप माहिती नाही. शेवटच्या एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार, याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये कायम आहे.
सासू-सून या टिपीकल विषयावर आधारित असूनही या मालिकेने कायमच वेगळेपण जपलं. पुरोगामी विचारांच्या कणखर अक्कासाहेबांची सून कल्याणीवर असलेली माया कौतुकाचा विषय ठरली होती. अक्कासाहेब यांचा प्रत्येक संवादाच्या अखेरीस 'कळ्ळं' हा शब्द प्रचंड गाजला.
हर्षदा खानविलकर यांनी अक्कासाहेब तर जुई गडकरीने कल्याणी ही भूमिका साकारली होती. काहीच महिन्यांपूर्वी कल्याणीचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. याशिवाय मृणाल चंद्रकांत, आस्ताद काळे, प्रदीप वेलणकर, शर्मिला शिंदे हे कलाकार मालिकेत झळकले होते.