मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. प्रत्युषा गर्भवती होती, मात्र आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी तिने गर्भपात केला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 'बालिका वधू' या मालिकेत आनंदीची भूमिका साकारलेल्या 24 वर्षीय प्रत्युषाने 1 एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गर्भाशयाच्या ऊतींची हिस्टोपॅथॉलॉजिकल चाचणीनंतर ही बाब समोर आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आत्यहत्येच्या काही दिवस किंवा महिनाभरआधी प्रत्युषाला गर्भधारणा झाली होती. शिवाय गर्भाचा मृत्यू झाल्याचं या चाचणीतून समोर आलं आहे. मात्र गर्भ नेमकं किती दिवसांचं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, "गर्भाशयात इन्फेक्शन आणि जखम दिसून आली आहे, जी गर्भपात करताना झाली असावी. गर्भापात करतानाच अशा प्रकारची जखमी होऊ शकते." परंतु त्या बाळाचे वडील कोण याचा शोध घेणं पोलिसांसाठी अडचणीचं ठरणार आहे. कारण ऊतीच शिक्कल नसल्याने बाळाची डीएनए चाचणी करणं अवघड असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, आम्ही अहवालातील माहिती सांगू शकणार नाही. हा अहवाल पोलिसांकडे सोपवला आहे, असं जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. लहाने यांनी सांगितलं.
प्रत्युषाच्या आत्महत्येचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे. गळफास घेतल्याने प्रत्युषाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर प्रत्युषाचा लिव्ह-इन पार्टनर राहुल राजविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन 25 एप्रिलपर्यंत स्थगित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात राहुलला 23 एप्रिल बांगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार आहे. यापूर्वी कोर्टाने त्याला अंतरिम जामीन देऊन अटकेला एक आठवडची स्थगिती दिली होती.
संबंधित बातम्या