मुंबई: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात तिचा प्रियकर राहुल राज सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतल्यानंतप राहुलला घेऊन पोलिस सिद्धार्थ रुग्णालयात दाखल झाले आहेत. सिद्धार्थ रुग्णालयात प्रत्युषाचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, प्रत्युषाचे आई वडिलही मुंबईत दाखल झाले असून ते सिद्धार्थ रुग्णालयात पोहोचले आहेत.


 

आनंदीच्या भूमिकेतून घराघरात आपली छाप सोडलेल्या प्रत्युषा बॅनर्जीनं गोरेगावमधल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या प्रियकरानं म्हणजेच राहुल राज सिंगनं तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

 

दरम्यान, प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर तिच्या जमशेदपूरच्या घरावर शोककळा पसरली आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येची बातमी समजताच कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. काही दिवसांपूर्वी प्रत्युषाचा फोन आला होता. तेव्हा ती नाराज वाटत होती. अशी माहिती प्रत्युषाच्या काकांनी दिली. आपली स्वप्न साकार करण्याची जिद्द ठेवणारी आज आपल्यात नाही, हे सत्य मानायला अजूनही कुटुंबीय तयार नाही.