Post Office Ughad Aahe Marathi Serial : 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) या वेगळ्या धाटणीच्या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. नव्वदच्या दशकातला पोस्ट ऑफीसचा काळ या मालिकेत दाखवल्याने प्रेक्षकांनीदेखील या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 


'पोस्ट ऑफिस उघडं आहे' ही मालिका गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आता तीन महिन्यांतच ही मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनलने घेतला आहे. या मालिकेचा शेवटचा भाग येत्या 2 एप्रिलला प्रसारित होणार आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. 


हास्यजत्रेतल्या कलाकारांची 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' मालिका


90 चं दशकं नव्या पिढीला अनुभवता यावं, नवीन पिढीला त्या काळाची ओळख पटावी या हेतूने 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' ही मालिका 5 जानेवारीपासून सुरू आहे. या मालिकेमध्ये समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे, ईशा डे, पृथ्वीक प्रताप, आशुतोष वाडेकर यांबरोबरच ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत दिसून आले. शिवाय मालिकेच्या शेवटी मराठमोळी अभिनेत्री  प्राजक्ता माळीचीदेखील एन्ट्री झाली. तब्बल सहा वर्षांनी तिने या मालिकेच्या माध्यमातून मालिकाविश्वात पदार्पण केले. 


पारगाव पोस्टाची अंतिम परीक्षा


संगणक प्रशिक्षक म्हणून आलेल्या पूजा गायकवाडची व्यक्तिरेखा प्राजक्ताने साकारली असून तिला मालिकेत पाहण्याची संधी मिळत असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाले आहेत. त्यात आता पोस्टात प्राजक्ताची एन्ट्री झाल्यामुळे आणखी काय गंमत पाहायला मिळणार तसेच पारगाव पोस्टाची अंतिम परीक्षा कशी असेल, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरेल. 


सध्या टेलिव्हिजन विश्वात सुरू असणाऱ्या इतर मालिकांपेक्षा वेगळा विषय आणि हलकीफुलकी मालिका म्हणून गेले तीन महिने ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. नव्वदीच्या दशकातलं पोस्टाचं भावविश्व उलगडणाऱ्या या मालिकेने गेले तीन महिने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. 


1997 च्या काळातलं पोस्ट ऑफीस, तिथलं कामकाज, येणाऱ्या अडचणी, विविध मानवी स्वभाव आणि त्यातून तयार होणारे विनोद प्रेक्षकांना भावले. फक्त 40 भागांची असलेल्या या मालिकेचा शेवटचा भाग खूपच खास असणार आहे. येत्या रविवारी रात्री 9 वाजता 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.


संबंधित बातम्या


Post Office Ughad Aahe : प्रेक्षकांना मिळणार हास्याची मनी ऑर्डर; 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' नवी मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज