Phulala Sugandh Maticha : 'फुलाला सुगंध मातीचा' (Phulala Sugandh Maticha) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका नेहमी पहिल्या तीन क्रमांकावर असते. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे चॅनलने या मालिकेचं पुन:प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. नव-नव्या ट्वीस्टमुळे ही मालिका कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ही मालिका गोड वळणावर थांबत असली तरी लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण होणार आहे. 5 डिसेंबरपासून सायंकाळी सहा वाजता ही मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे.
मालिकेसंदर्भात सतीश राजवाडे म्हणाले,"फुलाला सुगंध मातीचा' ही एक यशस्वी मालिका आहे. सुंदर कथा, पटकथा, अभिनय आणि दिग्दर्शनामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहिल. प्रत्येक कथेला एक छान शेवट असतो. त्यामुळे आम्ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. पण ही मालिका संपूच नये, अशी प्रेक्षकांची मागणी आहे. त्यामुळे आम्ही या मालिकेचं पुन:प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेत मुख्य भूमिकेत असणारा हर्षद अतकरी म्हणाला,"फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत शुभमची व्यक्तिरेखा साकारणं खूप कठीण होतं. कारण शुभमसारख्या मनाने चांगल्या असणाऱ्या व्यक्ती फारच क्वचित सापडतील. या मालिकेने मला चांगुलपणा, शांतपणा, सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे हे पात्र कायमच माझ्याजवळ राहिल. आता 5 डिसेंबरपासून प्रेक्षकांना पुन्हा शुभम-कीर्तीचा प्रवास रिपिट टेलिकास्टच्या रुपात अनुभवायला मिळेल याचा आनंद आहे".
मालिकेतील कीर्ती म्हणजेच समृद्धी केळकर म्हणाली,"फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आणि पात्र माझ्यासाठी ड्रीमरोल होता. या पात्राच्या माध्यमातून प्रेम, भांडण, पोलीस खात्यातलं कर्तव्य, कर्तव्य बजावताना करावे लागणारे स्टण्ट्स अशा अनेक गोष्टी करण्याची संधी मिळाली".
संबंधित बातम्या