Daya Ben Worked In Aishwarya's Film : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) हा शो देशभरात वर्षानुवर्षे पसंत केला जात आहे. शोमधील सर्वच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपले हक्काचे, खास स्थान निर्माण केले आहे. असे काही कलाकार आहेत, जे वर्षानुवर्षे शोमधून गायब आहेत. परंतु, तरीही प्रेक्षकांच्या आवडत्या यादीत समाविष्ट आहेत.


त्यातील एक म्हणजे दिशा वाकानी (Disha Vakani). लोक तिला फक्त ‘दया’ या व्यक्तिरेखेसाठी ओळखतात. मात्र, तिने अनेक चित्रपटही केले आहेत, हे फार कमी लोकांना माहीत असेल.


ऐश्वर्यासोबत शेअर केली स्क्रीन


टीव्हीवरची ‘दया भाभी’ म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी 2008मध्ये आलेल्या 'जोधा अकबर' (Jodha Akbar) चित्रपटातही झळकली होती. या चित्रपटात, तिने ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि हृतिक रोशनसोबत (Hritik Roshan) स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात ती त्यांच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिने ‘माधवी जोशी’ही भूमिका साकारली होती. ‘माधवी जोशी’ हे पात्र एक गुप्त रक्षकाचे होते. दिशाने साकारलेली ‘माधवी जोशी’ लग्नानंतर मुघल साम्राज्यात राणी जोधाबाईला साथ देत होती.


‘तारक मेहता..’मधून मिळाली ओळख


मात्र, तेव्हा लोकांनी तिची दखल घेतली नसली, तरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधील तिची भूमिका, नेहमी चर्चित भूमिका म्हणून गणली गेली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दया म्हणजेच दिशा वकानीने केवळ ऐश्वर्यासोबतच नाही, तर ‘देवदास’मध्ये शाहरुख खानसोबतही स्क्रीन शेअर केली आहे. ‘देवदास’ चित्रपटामध्ये तिने सखीची भूमिका साकारली होती.


याशिवाय दिशा वकानी अनुपम खेर यांच्या 'नॉट सो पॉप्युलर' (Not So Popular), प्रियांका चोप्राच्या 'लव्ह स्टोरी 2050' (Love Story 2050) आणि आमिर खानच्या 'मंगल पांडे'मध्येही (Mangal Pandey) दिसली आहे. मात्र, ओळख मिळवून देणाऱ्या ‘तारक मेहता..’ या शोमध्ये दया बऱ्याच दिवसांपासून दिसलेली नाही. 2017 मध्ये तिने मॅटर्निटी ब्रेक घेतला होता, त्यानंतर ती अद्याप सेटवर परतलेली नाही.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha