Nitish Bharadwaj :  छोट्या पडद्यावर बी.आर. चोप्रा (B. R. Chopra) यांची टीव्ही मालिका महाभारत (Mahabharat) या मालिकेने इतिहास घडवला. या मालिकेत श्रीकृष्णाची व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj ) यांची देशभरात ओळख निर्माण झाली. मात्र, हे नितीश भारद्वाज हे सध्या आपल्या वैयक्तीक कारणांनी चर्चेत आले आहेत. भारद्वाज यांनी आपली पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे विरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. पत्नी स्मिताने आपल्या मुलींचे अपहरण केले असल्याचे भारद्वाज यांनी म्हटले. या प्रकरणाची चौकशी सध्या अतिरिक्त पोलीस आयुक्त शालिनी दीक्षित यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 


दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, नितीश भारद्वाज यांनी 14 फेब्रुवारी रोजी भोपाळचे  पोलीस आयुक्त हरिनारायणचारी मिश्रा यांच्याकडे लिखीत तक्रार केली आहे.  या तक्रारीनुसार, कोर्टाच्या आदेशानंतरही त्यांची आयएएस पत्नी स्मिता घाटे या त्यांच्या मुलींना भेटू देत नाही अथवा बोलण्यास ही देत नाही. आपला फोन नंबर प्रत्येक ठिकाणांहून ब्लॉक करण्यात आला असल्याची तक्रार नितीश भारद्वाज यांनी केली आहे. 


चार वर्षांपासून मुलींसोबत बोलणं नाही... 


60 वर्षीय नितीश भारद्वाज यांनी सांगितले की, मागील चार वर्षांपासून आपण आपल्या मुलींसोबत बोलणं झाले नाही. पत्नीने मागील दीड वर्षात मुलींचे अनेक ठिकाणी अॅडमिशन केले आहेत.या आधी मुली भोपाळमध्ये शिकत होत्या. त्यानंतर  त्यांना उटीला पाठवण्यात आले. 






याआधी देखील केलीय तक्रार... 


नितीश यांनी या प्रकरणी या आधीदेखील तक्रार केली आहे. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पत्नी स्मिता ही मुलींना आपल्याविरोधात भडकवत असल्याची तक्रार तिने केली. 


नितीश यांचा दुसरा विवाह


नितीश यांचा पहिला विवाह 1991 मध्ये मोनिशा पाटिल सोबत झाला. जवळपास 15 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  2009 मध्ये नितीश यांनी आयएएस अधिकारी स्मिता यांच्यासोबत विवाह केला. मात्र, त्यांचा हा संसार 10 वर्षच टिकला. मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला. वर्ष 2022  मध्ये दोघे वेगळे झाले.