Subodh Bhave : वाढदिवासाच्या शुभेच्छा इंग्रजी किंवा हिंदी गाण्यातून देण्याऐवजी मराठी गाण्यांतून का दिल्या जाऊ नयेत? हा प्रश्न अभिनेता-दिग्दर्शक, निर्माता सुबोध भावे याने अनेक कार्यक्रामांतून उपस्थित केला. या प्रश्नावर गांभीर्याने विचार करत मराठी संगीत दिग्दर्शक आर. विशालने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी गाणं लिहून, रचून आणि संगीतबद्ध तयार केलं. "जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा... मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा" असे त्या गाण्याचे बोल असून त्या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकताच सुबोध भावेचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने सुबोध भावेच्या चाहत्यांनी आर. विशालने तयार केलेल्या मराठी गाण्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सवर स्टोरीज तयार केल्या होत्या. 


आर. विशाल गेल्या 12 वर्षांपासून मराठी संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. 'झी मराठीवरची लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'चे शीर्षक गीत त्याने लिहिलंही होतं आणि संगीतबद्धही केलं होतं. 'झी युवा' वरील हृता दुर्गुळेची लोकप्रिय मालिका 'फुलपाखरू' या मिलिकेतील 20 गाणी आर. विशाल  संगीतबद्ध केली होती. 'लव्ह, लग्न लोचा', 'इल्युझन' आणि 'मीटर डाऊन' या वेब सिरीजची शीर्षक गीतं आर. विशालने तयार केली आहेत. विशालची गाणी सोनू निगम, स्वानंद किरकिरे तसेच अरमान मलिक यांनी गायली आहेत. विशालच्या वाढदिवसाचं मराठी गाणं या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 


आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाविषयी विशाल सांगतो, "अनेकदा वाढदिवसाचा केक कापताना 'हॅपी बर्थ डे टु यू' किंवा 'बार बार दिन ये आये', नाहीतर 'मेरे भाई का बर्थ डे' सारखी गाणी म्हणून केक कापला जातो. प्रत्येकाने वाढदिवस साजरा करताना त्यांच्या त्यांच्या मातृभाषेतील वाढदिवसावर रचलेली गाणी म्हणून वाढदिवस साजरा का केला जात नाही हा प्रश्न मला सतावत होता. काही महिन्यांपूर्वी सुबोध भावे सहजच म्हणून गेले की, मराठी भाषेत वाढदिवसावर रचलेले गाणे तयार झाले पाहिजे. मग ठरवलं की, यावर विचार केलाच पाहिजे. दोन दिवसांत गाणं लिहून, रचून तसेच संगीतबद्ध करून तयार केलं. मी माझ्या मित्र परिवारात ते व्हायरल केलं. खूप जणांना आवडलं. काहींनी तर त्या  वाढदिवसाच्या स्टोरीज तयार करून त्या पोस्ट केल्या. नुकताच सुबोध भावेंचाही वाढदिवस झाला. त्यावेळेसही  मी रचलेल्या गाण्यावर स्टोरीज तयार करून सुबोध भावेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे आता  "जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा... मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा" हे  गाणं  म्हणून केक कापता येईल. "  


विशाल पुढे असंही सांगतो, " "जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा... मनापासूनी लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा" या मी तयार केलेल्या गाण्याचं सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गाण्याचे शब्द खूप सहज आणि सोपे आहेत. ते पटकन ओठांवर रेंगाळतील अशीच गाण्याची रचना केलेली आहे.