Tharla Tar Mag Marathi Serial : स्टार प्रवाहवर 5 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून रडायचं नाही तर लढायचं असं ठामपणे सांगणारी सायली लवकरच मनोरंजनाच्या प्रवाहात सामील होणार आहे. या नव्या मालिकेत सायली बरोबरच आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा असणार आहे आणि ती म्हणजे अर्जुन सुभेदाराची. अभिनेता अमित भानुशाली (Amit Bhanushali) ही व्यक्तिरेखा साकारणार असून तब्बल नऊ वर्षांनंतर अमित मराठी मालिका विश्वात दमदार कमबॅक करणार आहे. 


भूमिकेविषयी सांगताना अमित भानुशाली म्हणाला...


'ठरलं तर मग' मालिकेतील या भूमिकेविषयी सांगताना अमित भानुशाली म्हणाला, ‘ही भूमिका साकारण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. आतापर्यंत मी रोमॅन्टिक हिरोची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील पात्र आजवर साकारलेल्या भूमिकांच्या पूर्णपणे वेगळं आहे. अर्जुन एक नामांकित वकील आहे. खूप कमी बोलणारा आणि कडक शिस्तीचा आहे. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारताना माझी कसोटी लागतेय. आमचे दिग्दर्शक सचिन गोखले मला हे पात्र उभं करण्यासाठी खूप मदत करत आहेत. स्टार प्रवाहसोबत मी मन उधाण वाऱ्याचे ही मालिका केली होती. पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करताना प्रचंड आनंद होत आहे. आमच्या निर्मात्या म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत मी एक हिंदी मालिकेत काम केलं होतं. सुचित्रा ताई सहकलाकार म्हणून उत्तम आहेतच पण निर्माती म्हणूनही त्यांच्यासोबत काम करताना धमाल येतेय. आमच्या सेटवर खूपच खेळीमेळीचं वातावरण असतं. शूट संपल्यानंतरही घरी जायची इच्छा होत नाही. सहकलाकारांसोबत छान मैत्री झाली आहे. मुळात आमच्या सेटवर प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळेच सीन करताना मजा येते. पडद्यामागचा हा घट्ट बंध प्रेक्षकांना मालिका बघतानाही जाणवेल.


या मालिकेत अमित भानुशालीबरोबरच अभिनेत्री जुई गडकरी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 'सायली' हे जुईच्या पात्राचं नाव आहे. आता या मालिकेत अमित आणि जुईची भूमिका नेमकी कशी दिसेल याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 


महत्वाच्या बातम्या : 


World Television Day 2022 : सासू-सुनांच्या मालिका जास्त हिट का होतात? टीआरपीत नंबर 1 असलेले सतीश राजवाडे काय म्हणाले? जाणून घ्या...