मुंबई : सामाजिक विषयांना वाचा फोडून मराठी सिनेमात आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण करणारा दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे आता आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसून येणार आहे. सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती' या रियालिटी शोचे सूत्रसंचालन आता नागराज मंजुळे करणार आहे.



याबाबत स्वतः नागराज मंजुळेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक टीझर पोस्ट करत माहिती दिली आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच हा रियालिटी शो सुरु होणार आहे. नागराजच्या रांगड्या भाषेचा साज आता या रियालिटी शो ला लागणार असल्याने या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

याआधीच्या पर्वाचं नाव ‘कोण होईल मराठी करोडपती’ असं होतं आणि त्याचं सूत्रसंचालन अभिनेता स्वप्निल जोशी करत होता. या पर्वाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. तेव्हा आता दुसऱ्या पर्वासाठी सूत्रसंचालक कोण असेल? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.

'कौन बनेगा करोडपती' या हिंदी शोचे सूत्रसंचालन बिग बी अमिताभ बच्चन हे करतात. नागराज मंजुळे यांच्या  सिनेमात बिग बी खुद्द झळकत आहेत. नुकतीच या सिनेमाचे शूटिंग नागपुरात पार पडले आहे. हिंदीतील कौन बनेगा करोडपती देखील लवकरच येणार आहे. त्यामुळे मराठी भाषेत नागराज मंजुळे आणि हिंदीमध्ये अमिताभ बच्चन अशी पर्वणी आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.