Shaktimaan TV Show : 'शक्तिमान' हा 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो होता. 'शक्तिमान'च्या रुपाने भारतीयांना पहिला सुपरहिरो मिळाला. 90 च्या दशकातील लहानग्यांमध्ये या शोची प्रचंड क्रेझ होती. काही दिवसांपूर्वी अभिनेते मुकेश खन्ना यांनी या शोची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. 19 वर्षानंतर शक्तिमान शो परतणार अशी त्यांनी घोषणा केली होती. मात्र, आता मुकेश खन्ना यांच्याकडून चाहत्यांची फसवणूक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.


'शक्तिमान'च्या चाहत्यांची निराशा


अभिनेते मुकेश खन्ना यांचा 'शक्तिमान' हा सुपरहिरो शो 90 च्या दशकात मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांच्या आवडीचा शो होता. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोनं सर्वांना वेड लावलं होतं. चाहते संपूर्ण कुटुंबासह हा शो पाहायचे. अनेक वर्षांपासून हा शो परतणार असल्याची चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी मुकेश खन्ना यांनी शक्तिमान परतणार असल्याची घोषणा केली होती, त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती. यासंदर्भात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे.


19 वर्षांनंतर सुपरहिरो परतला पण...


अभिनेते मुकेश खन्ना यांनी शक्तिमानच्या पुनरागमनाची घोषणा केली होती, पण नवीन शोमध्ये जुन्या ॲक्शन आणि खलनायकांऐवजी शक्तिमान लहान मुलांना देशातील शूर क्रांतिकारकांशी संबंधित कोडे विचारताना दिसत आहेत. हा नवा लूक चाहत्यांसाठी धक्कादायक ठरत आहे.


नवीन लूकने चाहत्यांची निराशा


शक्तिमानच्या या नवीन लूकने नक्कीच चाहत्यांची निराशा केली आहे. शक्तिमान शोचा कमबॅक म्हणजे हा शो टीव्हीवर परत येईल आणि यामध्ये भरपूर ॲक्शन प्रेक्षकांना अपेक्षित होती पण, ता हा शो फक्त यूट्यूबवरच स्ट्रीम होईल, जो जुन्या प्रेक्षकांसाठी मोठा धक्का आहे.


दूरदर्शन किंवा टीव्हीवर दिसणार नाही शक्तिमान


शक्तिमानच्या नवीन सीझनचा पहिला भाग 11 नोव्हेंबर रोजी मुकेश खन्ना यांच्या भीष्मा इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. यानंतर हा कार्यक्रम दूरदर्शन किंवा टीव्हीवर दाखवला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे चाहत्यांचा पदरी निराशा आली आहे.


शक्तिमानाच्या नावाखाली फसवणूक?


चाहत्यांच्या मनात शक्तिमानची प्रतिमा अन्यायाविरोधात लढण्याची होती. हवेत उडणारा आणि आकाशात फिरणारा शक्तिमान चाहत्यांना अपेक्षित होता. पण, आता मुकेश खन्ना यांचा शक्तिमान शो फक्त मुलांनाच ज्ञान देताना दिसणार आहे. या शोमधून लहान मुलांना देशातील शूर क्रांतिकारकांबद्दल माहिती मिळणार आहे. म्हणजे जुन्या शक्तिमान शोप्रमाणे यावेळी खलनायक आणि सुपरहिरोची ॲक्शन असणार नाही. तसेच गंगाधर आणि ताम्रराज किलविश यांचाही उल्लेख नाही.