Mi Punha Yein : महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडली आहे. राजकारणातील साधारण परिस्थितीवर मार्मिक पद्घतीने भाष्य करणारी ‘मी पुन्हा येईन' (Mi Punha Yein) ही वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी’वर प्रदर्शित झाली आहे. 


'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा अरविंद जगताप यांनी सांभाळली आहे. या सीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे असे दमदार कलाकार आहेत. 


सध्या 'मी पुन्हा येईन'चे तीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यात सत्तेसाठी पक्ष वरिष्ठांना विनवण्या, सत्तानाट्य, मंत्रीपदासाठी राजकारण्यांची फसवणूक, आमदारांची पळवापळवी हे सर्व विनोदी शैलीत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 


दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, "सध्याच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नसून निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली आहे. राजकारणामागील गोष्टी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील." 




प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " विनोदीशैलीत निर्मित केलेली ही वेबसीरिज श्रोत्यांना खिळवून ठेवणारी आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, हे वेबसीरिज राहिल्यावर कळेलच. प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती केली आहे. 


'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण, सिनेमात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी, राजकीय कुलंगड्या, शह-काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरीज पूर्ण करेल"


संबंधित बातम्या


Mi Punha yein : राजकारणात काही खरं नाही...'मी पुन्हा येईन' वेबसीरिज संदर्भात अरविंद जगताप यांनी केली खास पोस्ट शेअर


Mi Punha Yein : 'मी पुन्हा येईन' वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज; भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत