Master Chef India : सध्या रिॲलिटी शोपैकी एक असणारा 'मास्टर शेफ इंडिया' (Master Chef India) शो इंटरेस्टिंग वळणावर आहे. या शोमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांसमोर नवनवीन आव्हानं येतात. यामध्ये स्पर्धकांची कसोटी पणाला लागते. कदाचित यामुळेच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आवश्यक असलेला मसाला मास्टर शेफ इंडियाच्या किचनमधून टेलिव्हिजनवर झळकत आहे. पण ही झाली या शोची एक बाजू. या शोची दुसरी बाजू पाहिली तर, सोशल मीडियावर नेटकरी या शोला एक स्क्रिप्टेड रिॲलिटी शो असल्याचं बोलत आहेत. एवढंच नव्हे तर आता मास्टर शेफ इंडिया रिॲलिटी शो कमी आणि डेलीसोप झाल्याचा आरोपही नेटकऱ्यांकडून केला जातोय. तर काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, मास्टर शेफ इंडिया आता बिग बॉस (Bigg Boss) आणि इंडियन आयडलच्या (Indian Idol) पावलावर पाऊल ठेवत आहे. कारण आता शोमधील कंटेंट भावनिक आणि कौटुंबिक असल्याचं जाणवू लागलं आहे. 


असं कसं मास्टर शेफ? 


बिग बॉस शो (Bigg Boss) संपला पण त्याची सावली मास्टर शेफवर पडली, असं म्हणत नेटकरी मास्टर शेफ इंडिया आणि शोमधील जजेसवर निशाणा साधत आहेत. सध्या इंडियन आयडॉल शेवटच्या टप्प्यात आलं आहे. अशातच मास्टर शेफ हा 'नवा टॉक ऑफ द टाऊन' शो बनला आहे. मास्टर शेफ इंडियाच्या किचनमध्ये बनणाऱ्या पदार्थांमध्ये मसाला असो वा नसो, पण नेटकऱ्यांना मात्र या शोमधून खूपच मसाला मिळतोय. नेटकरी या शोच्या क्लिप्स ट्विटरवर शेअर करत आहेत. तसेच, हा शो आता बिग बॉसच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचंही नेटकऱ्यांकडून बोललं जात आहे. 


कधी स्पर्धकांमध्ये झालेले वाद दाखवले जातात, तर कधी स्पर्धकांच्या घरातील सदस्य येऊन इमोशनल टच देऊन जातात. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, हा एक टेलेंट आणि बिजनेसशी संबंधित रिॲलिटी शो आहे, ज्यामध्ये अशा गोष्टी दाखवणे हा फक्त टीआरपी गेमचाच एक भाग असतो, असंही नेटकरी म्हणतायत. 


मास्टर शेफ देतंय बिग बॉस-इंडियन आयडॉलच्या पावलावर पाऊल 


मास्टर शेफच्या प्रोमोची क्लिप एका युजरनं ट्विटरवर शेअर केली आणि लिहिलंय की, "पुढच्या आठवड्याच्या प्रोमोमध्ये बिग बॉससारखा मसाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं 'चूप रहो, हात चलाव', असं सांगितलं जातंय, ते पाहुन असंच वाटतंय." इतर युजर्सनीही या क्लिपवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता मास्टर शेफच्या स्पर्धकांनाही बिग बॉसच्या कुटुंबियांप्रमाणेच जज केलं जातंय, असं एका युजरनं लिहिलंय. तसेच, 'बिग बॉस इज बैक!', असंही एका युजरनं लिहिलंय. 














मास्टर शेफ बायस्ड


अनेक लोक शोच्या निर्मात्यांवर पक्षपाती असल्याचा आरोपही करत आहेत. युजर्स म्हणाले की, विजेते आधीच निश्चित झाले आहेत, मग तुम्ही इतकी नाटकं का करताय? ही गोष्ट पटतच नाहीये. प्रोमोवर कमेंट करून आणि नाराजी व्यक्त करून लोक शोच्या मेकर्सना ट्रोल करत आहेत. आणखी एका यूजर्सचं म्हणणं आहे की, बिग बॉस पुन्हा सुरू झाला आहे का? तर काही लोक म्हणतायत, आता टीआरपीसाठी इथेही नाटक चालणार. काय चाललंय काय? 


ट्विटरवर मास्टर शेफ इंडियाचा जो प्रोमो ट्रोल केला जात आहे. त्या प्रोमोमध्ये एक स्पर्धक आउटडोअर एरियामध्ये एक टीम चॅलेंज करत आहेत. दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. ब्रंच टेबल तयार आहे, ज्या टेलबरवर दोन्ही टीम आपले पदार्थ तयार करत आहेत. चॅलेंज पूर्ण करताना स्पर्धकांची धावपळ होताना दिसतेय. यावेळी दोन स्पर्धकांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळतेय. याचवेळी स्पर्धक एकमेकांना बिग बॉससारखं एकमेकांना टोमणे मारत असल्याचं दिसत आहे.