Marathi TV Serials Star Pravah vs Zee Marathi :  छोट्या पडद्यावर टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. मागील अनेक आठवड्यांपासून 'स्टार प्रवाह'ने (Star Pravah) आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर, दुसरीकडे 'झी मराठी'कडून (Zee Marathi) या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजपासून 'झी मराठी'वर (Zee Marathi) दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. तर, दुसरीकडे टस्टार प्रवाहटवर एक नवीन मालिका सुरू होणार आहे. 'पुन्हा कर्तव्य आहे'  आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navari Mile Hitlerla) या मालिका झी मराठीवर सुरू होणार आहे. तर, घरोघरी मातीच्या चुली (Gharoghari Matichya Chuli) ही नवी मालिका सुरू होत आहे. त्यामुळे आता नव्या मालिका प्रेक्षकांना किती भुरळ घालणार याची उत्सुकता लागली आहे. 


'झी मराठी'वर आजपासून दोन नव्या मालिका


'झी मराठी'वर दोन नव्या मराठी मालिका सुरू होणार आहे. झी मराठीवर मागील 10 वर्षांपासून सुरू असलेली चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोच्या वेळेवर दोन नव्या मालिका सुरू होत आहे. आजपासून, 18 मार्चपासून या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ही मालिका रात्री 9.30 वाजता दररोज प्रसारीत होणार आहे.  अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


 






तर, ‘नवरी मिळे हिटलरला’ ही दुसरी नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोज रात्री 10 वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी केली. या मालिकेत राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमिजा पाटील, सानिका काशीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 






झी मराठीवर सुरू होणाऱ्या दोन्ही मालिका या रिमेक असल्याची चर्चा रंगली. पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका हिंदीमधील ‘पुनर्विवाह’ मालिकेचा रिमेक आहे. तर, ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ या मालिकेचा रिमेक ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या रुपाने मराठी छोट्या पडद्यावर येणार आहे. 



स्टार प्रवाहवर 'घरोघरी मातीच्या चुली'


स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून  'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत तगडी स्टार कास्ट आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. आरोही सांबरे ही बालकलाकारही झळकणार आहे.  सविता प्रभुणे, सुमित पुसावळे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, भक्ती देसाई, सुनील गोडसे आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 


'पारू' आणि 'घरोघरी मातीच्या चुली'


'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका सायंकाळी 7.30 वाजता प्रसारीत होणार आहे. याच वेळेत झी मराठीवर पारू ही नवी मालिका सुरू आहे. पारू या मालिकेचा सध्या टीआरपी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे आता या नव्या दोन मालिकांमध्ये टीआरपीची थेट स्पर्धा असणार आहे.