Marathi Serials Ashadhi Ekadashi : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. आपली मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी आणि मालिकेचा टीआरपी वाढावा यासाठी निर्माते आणि लेखक वेगवेगळे प्रयोग करत आहेत. आता आषाढी एकादशी निमित्त मराठी मालिकांचे विशेष भाग रंगणार आहेत. 


'तुझेच मी गीत गात आहे', 'रंग माझा वेगळा', 'मन धागा धागा जोडते नवा', 'ठरलं तर मग','शुभविवाह' आणि सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत विठुरायाच्या साक्षीने नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. तर 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत आषाधी एकादशी निमित्त स्वामी समर्थांच्या रुपात विठुमाऊलींचं दर्शन घडणार आहे. 'योगयोगेश्वार जयशंकर' या मालिकेतही आषाढी एकादशी विशेष भाग पाहायला मिळणार आहे. 


आषाढी एकदशीला संपूर्ण महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीत दाखल होतात. प्रत्येकाच्यात मनात आस असते ती लाडक्या विठुरायाच्या भेटीची. आता मालिकांमध्येही 'आषाढी एकादशी विशेष भाग' पाहायला मिळणार आहेत. 


मालिकांमध्ये रंगणार 'आषाढी एकादशी' विशेष भाग


'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपा विठ्ठलाची मनापासून आराधना करते. प्रत्येक सुख-दु:खाच्या प्रसंगी विठुमाऊलीनेच दीपाची साथ दिली आहे. दीपाचं आयुष्य आता निर्णायक वळणावर असताना विठुरायाच्याच साक्षीने दीपा आणि कार्तिकमधील गैरसमज दूर होणार आहेत. एकीकडे दीपाच्या विरोधात कट रचल्याची जाणीव कार्तिकला होणार आहे. तर साक्षीचा खून आयेषानेच केल्याचा पुरावा दीपाच्या हाती लागला आहे. कार्तिकला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच्या दीपाच्या या प्रयत्नांना विठुराया यश देणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.


दीपा-कार्तिक प्रमाणेच 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतही मंजुळा आणि मल्हारच्या नात्यात नवं वळण येणार आहे. मंजुळालाच आपली आई समजणाऱ्या स्वराजने विठुमाऊलीला आपल्या आई-बाबांची भेट व्हावी यासाठी साकडं घातलं आहे. 'आषाढी एकादशी' निमित्ताने विठ्ठलाच्या मंदिरात मोनिकासह दर्शनसाठी पोहोचलेला मल्हार पहिल्यांदा मंजुळाचा चेहरा पहाणार आहे. वैदेहीसारख्याच दिसणाऱ्या मंजुळाला पाहून मल्हारला धक्का बसणार आहे. मंजुळा आणि मल्हारच्या नात्यात नेमकं कोणतं वळण येणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.


'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत आनंदी स्पर्धेसाठी बनवलेली साडी विठ्ठलाच्या चरणापाशी ठेऊन यशासाठी प्रार्थना करत असतानाच अंशुमन मंदिरातून ती साडी गायब करतो. इतक्या मेहनतीने बनवलेली साडी गायब झाल्याचं लक्षात येताच आनंदीच्या पायाखालची जमीन सरकते. विठ्ठलाच्या आशीर्वादाने आनंदीला तिची साडी परत कशी मिळणार हे 'मन धागा धागा जोडते नवा'च्या पुढील भागांमधून उलगडेल. 


संबंधित बातम्या


Lokmanya : 'लोकमान्य' मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर; टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेदाला सुरुवात