Marathi Serial Updates Shivani Surve :  टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी मराठी वाहिन्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू आहेत. आजपासून स्टार प्रवाह वाहिनीवर (Star Pravaj) 'थोडं तुझं आणि थोडं माझं' (Thod Tuz Thod Maz) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) ही तब्बल 12 वर्षानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर कमबॅक करत आहे. याआधी शिवानी सुर्वेने 'देवयानी' मालिकेत काम केले होते. या  मालिकेमुळे शिवानी सुर्वे घराघरात पोहचली होती. 


शिवानी सुर्वेची पोस्ट चर्चेत...


'स्टार प्रवाह' वाहिनीवर 12 वर्षानंतर कमबॅक करत असलेली अभिनेत्री शिवानी सुर्वेने प्रेक्षकांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. शिवानी सु्र्वेने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 12 वर्षांपूर्वी स्टार प्रवाह परिवारा सोबत एक प्रवास सुरु केला होता जो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा ठरला. “देवयानी” ला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, आपलंस केलं, आज पर्यंत मनात ठेवलं असल्याची भावना तिने व्यक्त केली. शिवानीने पुढे म्हटले की, आज पुन्हा एक नवीन प्रवास सुरु करते आहे स्टार प्रवाह बरोबर, “थोड तुझं आणि थोड माझं” या मालिकेमधून मी तुम्हाला भेटायला येणार आहे. या “मानसी” वर सुद्धा असंच भरभरून प्रेम करा आणि मला खात्री आहे की “मानसी” सुद्धा तुमचं मन नक्की जिंकेल, असा विश्वास तिने व्यक्त केला. प्रेक्षकांनी या मालिकेला शुभेच्छा, आशिर्वाद द्यावे असेही तिने म्हटले. 







10 वर्षांनी मानसी कुलकर्णी मालिकेत झळकणार


शिवानी सु्र्वेसोबत अभिनेता समीर परांजपेची मुख्य भूमिका असणार आहे. 'गोठ' या मालिकेतून समीर चांगलाच लोकप्रिय झाला. त्याशिवाय, अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखिल या मालिकेच्या निमित्ताने तब्बल 10 वर्षांनंतर मालिका विश्वात कमबॅक करत आहे. अभिनेत्री मानसी कुलकर्णी या मालिकेत गायत्री प्रभू हे पात्र साकारणार आहे. गायत्रीला समोरच्या व्यक्तीला हरताना पाहायला आवडतं. ती कधीच कोणाला स्वत:समोर जिंकू देत नाही, त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते अशी व्यक्तीरेखी मानसीची असणार आहे. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं लागतं. 'स्टार प्रवाह'च्या या नव्या मालिकेतूनही अशाच नात्यांची गोष्ट उलगडणार आहे.