Madhavi Gogate Passes Away : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठीसह अनेक हिंदी मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. याशिवाय अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. सध्या 'स्टार प्लस' या हिंदी वाहिनीवर गाजत असलेल्या 'अनुपमा' या मालिकेशीही त्या जोडल्या गेल्या होत्या. 


माधवी गोगटे यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर आणि टेलिव्हिजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना कोरोनाचे निदान झालं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सेव्हन हिल रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी आहे. 


अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह 'गेला माधव कुणीकडे' तसेच 'अंदाज आपला आपला', 'भ्रमाचा भोपळा' ही त्यांची काही गाजलेली नाटकं. तर सध्या त्यांची 'सिंदुर की कीमत' ही हिंदी मालिका 'दंगल टीव्ही'वर सुरु होती. सध्या 'स्टार प्लस' या हिंदी वाहिनीवर गाजत असलेल्या 'अनुपमा' या मालिकेशीही त्या जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी या मालिकेतील मूळ नायिका अनुपमाच्या आईचं पात्र त्यांनी साकारलं होतं.


माधवी गोगटे यांनी रंगभूमीवरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. माधवी यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतही 'घनचक्कर' चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. 'घनचक्कर' चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. याच चित्रपटानं त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर 'सत्वपरीक्षा' या चित्रपटातही त्यांनी काम केले. सूत्रधार चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था', 'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढुंड लेंगी मंजिल हमें', 'कहीं तो होगा' या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. 'तुझं माझं जमतंय' या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.