महाभारतातील व्यक्तिरेखांना गे दाखवल्याने 'ममाज् बॉईज' अडचणीत
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2016 06:35 AM (IST)
मुंबई : पौराणिक ग्रंथाचा स्वैरानुवाद करताना तारतम्य न बाळगल्याने 'ममाज् बॉईज' ही शॉर्टफिल्म कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. महाभारताचं विडंबन असलेल्या या शॉर्टफिल्ममध्ये काही व्यक्तिरेखांना समलिंगी दाखवून खिल्ली उडवल्याने निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता, बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी, विवान शाह यांच्या मुख्य भूमिका असलेली ममाज् बॉईज ही 16 मिनिटांची शॉर्ट फिल्म सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अर्जुनची व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार त्याच्या भावंडांना त्यांची सेक्शुअॅलिटी म्हणजे लैंगिक कल विचारतो. त्यावर आपण होमोसेक्शुअल असल्याचं उत्तर ते देतात. हिंदूसेनेने यावर आक्षेप घेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. हा व्हिडिओ तात्काळ यूट्यूबवरुन हटवण्याची मागणी केली आहे. या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन अक्षत वर्मा यांनी केलं आहे. वर्मा यांचा 'देल्ली बेल्ली' हा सिनेमाही कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. व्हिडिओ :