Lokmanya Marathi Serial Latest Update : 'लोकमान्य' (Lokmanya) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेच्या माध्यमातून टिळकांचा जाज्वल्या देशभिमान पाहायला मिळत आहे. राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण आता ही मालिका एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. मालिकेत आता लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) आणि गोपाळ गणेश आगरकर (Gopal Ganesh Agarkar) यांच्यातील मतभेदाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेदाला सुरुवात
टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्रीत फूट पडणं, ही इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना होती. आता छोट्या पडद्यावरील 'लोकमान्य' मालिकेची गोष्ट या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. एकमेकांच्या विचारांशी प्रामाणिक असणारे टिळक आणि आगरकर मतभेद राखून परस्परांवर प्रेम करणारे होते. त्यांची मैत्री तुटणं, एकमेकांपासून दूर जाणं, अबोला धरणं, एकमेकांना न भेटणं असे अनेक कंगोरे 'लोकमान्य' या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेदाला सुरुवात कधी झाली?
न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आणि त्यानंतर केसरी व मराठा सुरू केल्यानंतर काही वर्षांत आपापल्या भूमिकांसंदर्भात टिळक आणि आगरकरांचे मतभेद उघड होऊ लागले. आगकरांचे म्हणणे होते की, राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व द्यायला हवे. तर टिळकांच्या मते, राजकीय स्वातंत्र्य आधी मिळायला हवं आणि सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. याच कारणांमुळे त्यांच्यातील मतभेदाची दरी रूंदावत गेली.
संमतीवयावरून आणि बालविवाहाच्या प्रश्नावरून आगरकर आणि टिळक यांच्यातील मतभेद विकोपाला गेले. त्यामुळे केसरीतून सुधारणावादी मत मांडताना आगरकरांची घुसमट होऊ लागली. म्हणून आगरकारांनी 'केसरी'चा राजीनामा दिला. त्यानंतर आगरकर आणि टिळक जिथे एकत्र राहत होते, ते घरही आगरकरांनी सोडलं. दोघांच्या घनिष्ट मैत्रीमध्ये आलेला हा दुरावा, दोघांनी त्या त्या वेळी घेतलेले निर्णय, मांडलेले विचार यांचे प्रभावी चित्रण 'लोकमान्य' मालिकेत पहायला मिळणार आहे.
अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली 'लोकमान्य'
'लोकमान्य' ही मालिका प्रेक्षक बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता झी मराठीवर पाहू शकतात. अल्पावधीतच या मालिकेची लोकप्रियता वाढली आहे. 'लोकमान्य' या मालिकेला टीआरपीच्या शर्यतीत 1.0 रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत अभिनेता क्षितिज दातेने (Kshitish Date) टिळकांची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या