मुंबई : मराठमोळ्या 18 वर्षीय चेतन साळुंखेने स्टार प्लस या वाहिनीवरील 'डान्स प्लस 4' या रिअॅलिटी शोच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ग्रॅण्ड फिनालेमध्ये शनिवारी रात्री 'डान्स प्लस 4' च्या विजेत्याच्या नावाची घोषणा झाली.
पण चेतनला ही ट्रॉफी सहजरित्या मिळाली नाही. यामध्ये त्याचे कठोर परिश्रम, सातत्य आणि दृढ विश्वास होता. चेतनने बालपणीच डान्सला सुरुवात केली होती. चेतनची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे कमी वयातच तो घरातील कर्ता पुरुष बनला. 'डान्स प्लस 4' रुपाने त्याच्या आयुष्यात सुवर्ण संधी आणली. डान्स रिअॅलिटी शोच्या विजेत्याबद्दल जाणून घेऊया.
1. चेतनचा जन्म पुण्यात झाला. चेतनने डान्ससोबतच त्याचं शिक्षणही पूर्ण करत आहे. 'डान्स प्लस 4' चा विजेता चेतन साळुंखे हा पुण्यातीत आकुर्डीमधल्या डॉ. डी वाय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
2. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने काम करण्यास सुरुवात केली. कुटुंबाला आर्थिक पाठिंबा देण्यासाठी चेतनने पार्ट टाईम जॉबही केला. त्यामुळे त्याला डान्सचं औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. पण डान्ससाठी असलेल्या जिद्दीने त्याला डान्समध्ये निपुण बनवलं. चेतनने यूट्यूबद्वारे डान्स स्टेप शिकल्या आहेत.
3. चेतनला 'पॉपिंग किंग' म्हटलं जातं. एखाद्या गुरुकडे जाण्याऐवजी मी इंटरनेटद्वारे डान्सचे बारकावे शिकले, असं चेतनने शोदरम्यान सांगितलं.
4. चेतन साळुंखे 2018 मध्ये 'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्येही सहभागी झाला होता. या शोमध्ये तो टॉप 5 मध्ये सामील झाला होता.
5. "रिअॅलिटी शो हे असं व्यासपीठ आहे, जे तुम्हाला एक मार्ग दाखवलं, तुम्ही काय काय करु शकता, याबाबत मार्गदर्शन करतं. हे माझ्यासाठी एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नाही. आज माझ्याकडे प्रसिद्धी आहे, कार्यक्रमांसाठी विचारणा होत आहे. याच्या माध्यमातून मी माझ्या कुटुंबाला आधार देऊ शकतो," अशा शब्दात चेतनने आपल्या भावना व्यक्त केल्या.