Sindhutai Mazi Mai: अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal)  यांच्या आयुष्यावर आधारित असणारी  “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai)  ही नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहेत. नुकतीच किरण माने यांनी या मालिकेबाबत एक खास पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.


 किरण माने यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'आज 'स्वातंत्र्य दिना'च्या दिवशी मी परत येतोय, ताठ मानेनं, ताठ कण्यानं ! दिड वर्षापूर्वीच्या 'त्या' दिवशी, ती घटना घडल्यावर मी सोशल मिडीयावर येऊन बोललो होतो ,"काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा...गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !" आज ते सिद्ध करून दाखवलं ! पण मला आनंद होतोय तुमच्यासाठी. 'त्या' सगळ्या काळात तुम्ही मायबाप प्रेक्षक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात. मला पूर्वीपेक्षा शंभरपटींनी प्रेम दिलंत. त्यामुळं आज या क्षणी नम्रपणे तुम्हा चाहत्यांच्या पायाशी रहाणं, हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचं असेल.'






पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'मी जी कलाकृती तुमच्यासाठी घेऊन येतोय, ती साधीसुधी नाय माझ्या भावांनो. शेकडो संकटांचा पहाड पार करून, हजारो अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंवरची मालिका आहे ही ! माईंच्या काळजात ज्या व्यक्तीबद्दल 'स्पेशल' जागा होती.. ज्यानं माईंच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया घातला, तो तुम्हाला माहित नसलेला 'अनसंग हिरो' मी साकारणार आहे. पैज लावून सांगतो, तो आणि त्याच्या लेकीमधला गहिरा जिव्हाळा पाहून तुम्ही हरवून जाल. हरखून जाल. यांना रोज भेटायची ओढ लागेल तुम्हाला! त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळुन फक्त एक वर्षच झालंवतं जेव्हा विदर्भातल्या एका छोट्या खेड्यातल्या, त्या माणसाच्या घरी हे अफलातून लेकरू जन्माला आलं. आपली भुमी स्वतंत्र झालीवती, पण आपल्या जुनाट समाजव्यवस्थेतनं 'स्त्री' मुक्त नव्हती झाली. ती चारभिंतीच्या आत गुलामगिरीचे चटके सोसतच होती. अशा काळात सख्ख्या आईसकट सगळ्यांनी नाकारलेल्या लेकीला पोटाशी धरणारा... जीव लावणारा.  तिला जोपासणारा.  घडवणारा.. 'बापमाणूस', द ग्रेट अभिमान साठे पुन्हा जिवंत करायला मिळणं, हे 'अभिनेता' म्हणून सुख आहे हो... निव्वळ सुख !'कमबॅक' अजून कसा पायजे सांगा बरं? माझी खात्रीय आजपासून रोज संध्याकाळी 7 वाजता 'कलर्स मराठी' चॅनलवर येऊन, हा अद्भूत प्रवास तुम्ही बघणार आहातच.. पण तुमच्या मुलाबाळांनासुद्धा आवर्जुन दाखवा.'


संबंधित बातम्या:


Kiran Mane: 'सिंधुताई माझी माई' मालिकेत किरण माने साकारणार 'ही' भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाले, 'त्याच्या संघर्षाचंच...'