Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सध्या “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेमध्ये ते अभिमान साठे ही भूमिका साकारतात. नुकतीच किरण माने यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सिंधुताई माझी माई या मालिकेमधील त्यांच्या भूमिकेबाबत सांगितलं आहे.
किरण माने एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ केबीसी या कार्यक्रमाच्या जुन्या एपिसोडचा आहे. या एपिसोडमध्ये अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) या अमिताभ बच्चन यांच्यासोबत संवाद साधताना दिसत आहेत.
किरण माने यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, सिंधुताई म्हणतात, 'माझ्या आईनं कधी प्रेम नाही केलं. माझ्या आईला मी नको होते. त्यामुळे तिनं माझे नाव चिंधी ठेवले. माझ्या वडिलांचे नाव अभिमान होते. माझे वडील खूप चांगले विचार करत होते. माझ्या वडिलांचा मला अभिमान वाट होता.' किरण माने यांनी केबीसी कार्यक्रमाचा हा जुना व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "सिंधुताईंसारख्या लेकीला आयुष्यभर 'अभिमान' वाटावा, असा बापमाणूस अभिमान साठे साकारताना रोज जे समाधान मिळतंय... ते शब्दांत नाही सांगू शकत! ईश्वरा जन्म हा दिला...प्रसवली कला... थोर उपकार!"
पाहा व्हिडीओ:
बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) सिझनमुळे किरण माने यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. किरण माने यांनी माझ्या नवऱ्याची बायको, मुलगी झाली हो या मालिकांमध्ये काम केलं. सध्या ते "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. किरण माने हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
"सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेचे कथानक सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेत प्रिया बेर्डे या देखील महत्वाची भूमिका साकारत आहेत.
संबंधित बातम्या :