Marathi Serial  Devdatta Nage :  छोट्या पडद्यावर सध्या पौराणिक विषयांवरील मालिकांना चांगला प्रतिसाद मिळतो. प्रेक्षकांचा प्रतिसाद असल्याने छोट्या पडद्यावर हा ट्रेंड सुरू असल्याचे चित्र आहे. 'विठुमाऊली' आणि 'दख्खनचा राजा' जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या पौराणिक मालिकेतून करण्यात येणार असल्याचे स्टार प्रवाहकडून सांगण्यात आले. या मालिकेत भगवान शिवशंकरच्या भूमिकेत देवदत्त नागे (Devdatta Nage) दिसणार आहे. 






देवदत्त नागेचे 'स्टार प्रवाह'वर 10 वर्षांनी कमबॅक


साडेतीन शक्तिपीठांचा महिमा जाणून घेण्यासाठी मुळात त्यांची निर्मिती कशी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच शक्तिरूप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकर साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास 10 वर्षांनंतर देवदत्त 'स्टार प्रवाह'च्या मालिकेत झळकणार आहे. 'देवयानी' या मालिकेत देवदत्त याने साकारलेल्या सम्राटराव विखे-पाटील या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.'देवयानी'नंतर तो पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत जोडला जात आहे. 


'उदे गं अंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची' या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना देवदत्त नागे म्हणाले, टीव्ही माझं अत्यंत आवडीचं माध्यम आहे. टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांच्या फक्त घरात नाही तर मनात देखील पोहोचता. 'स्टार प्रवाह'च्या 'देवयानी' मालिकेने मला अभिनेता म्हणून ओळख दिली. जवळपास 10 वर्षांनंतर मी पुन्हा एकदा 'स्टार प्रवाह'सोबत काम करतोय. प्रेक्षकांपर्यंत मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो, अशी भावना देखील देवदत्त नागे याने व्यक्त केली. शिव-शक्तीचं नातं अतूट आहे. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे. त्यामुळे साडे-तीन शक्तीपीठींच्या या गोष्टीमध्ये शिवशंकराचे नेमके कोणते अवतार होते आणि त्यामागे नेमकी कोणती कथा दडली आहे हे या मालिकेतून साकारण्याचा प्रयत्न असणार असल्याचे त्याने सांगितले.