Marathi TV Serial : मराठी छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची स्पर्धा सुरू आहे.  स्टार प्रवाह (Star Pravah), झी मराठी (Zee Marathi) या आघाडीच्या वाहिन्यांकडून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. तर, काही नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. टीआरपीच्या शर्यतीत आता  कलर्स मराठीकडून (Colors Marathi) नवा डाव टाकण्यात आला आहे. कलर्स वाहिनीवर (Colors Marath Channel) नवी मालिका सुरू करण्यात येत असल्याची घोषणा चॅनलचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केली आहे. 


दिग्दर्शक असलेले केदार शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी 'कलर्स मराठी'च्या प्रोग्रामिंग हेडची जबाबदारी स्वीकारली आहे.त्यानंतर मंगळवारी, केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर नव्या मालिकेची घोषणा केली आहे. इंद्रायणी असे या नव्या मालिकेचे नाव आहे. केदार शिंदे यांनी टीझर पोस्ट करताना म्हटले की, “वयाच्या 52 व्या वर्षी…मी एक नवी जबाबदारी स्वीकारली.. कलर्स मराठी प्रोगामिंग हेड…हे सगळं तुमच्या प्रेमाने आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने शक्य झालं. पुन्हा नव्या कलाकृतीचं टेन्शन आहेच…ही नवी कलाकृती माझ्या कलर्स मराठी टीमच्या मदतीने सादर होतेय. त्याचा हा पहिला टिझर…नक्की कळवा.. कसा वाटतोय ते.”






 


'इंद्रायणी' मालिकेच्या टीझरनुसार या मालिकेची कथा लहान मुलीच्या भोवती फिरणारी आहे. निरागस, अल्लड, खोडकर पण समंजस असलेली इंद्रायणी मालिकेच्या केंद्रस्थानी आहेत.  


'कलर्स मराठी'च्या या नव्या मालिकेच्या  नव्या टीझरवर प्रेक्षकांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत तुम्ही उत्तम सिनेमे दिले, आता मालिकाही उत्तमच असणार, अशा आशयाच्या कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत. 'इंद्रायणी'मालिकेच्या टीझरवर अक्षय केळकर, अमृता खानविलकर, स्पृहा जोशी, सुकन्या मोने, जयवंत वाडकर आदी कलाकारांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. 


‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये दिसणार बालकलाकार आरोही सांबरे


स्टार प्रवाहवर 18 मार्चपासून 'घरोघरी मातीच्या चुली'ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत बालकलाकार आरोही सांबरेची देखील भूमिका आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आरोही ओवीच्या भूमिकेत दिसेल. याआधी आरोही स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो, शुभविवाह आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून भेटीला आली आहे.