मुंबई: आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात जे भूतकाळाला नव्याने जिवंत करतात… त्या आठवणींना परत येऊन येतात… त्याच आठवणी ज्या बदललेल्या आयुष्याची जाणीव करुन देतात… असंच काहीसं घडलं विनोदवीर कपिल शर्मासोबत…
निमित्त होतं त्याच्या आगामी फिरंगी सिनेमाच्या प्रमोशनचं आणि त्या प्रमोशनसाठी कपिल पोहोचला ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या मंचावर.
ज्या मंचावर कधी काळी स्पर्धक म्हणून कपिलने पाऊल ठेवलं होतं त्याच मंचावर तो खास पाहुणा म्हणून आला होता.
एक काळ होता ज्यावेळी कपिल या मंचावर येण्यासाठी धडपडत होता. पण पदरी निराशाच येत होती. पण शेवटी द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या तिसऱ्या सीझनमध्ये त्याला संधी मिळाली आणि कपिलने त्या संधीचं सोनं केलं.
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोने कपिलचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ज्या शोमध्ये येण्यासाठी तो धडपडत होता तिथेच तो सेलिब्रिटी म्हणून आला.
या सेटवर कपिलने खूपच धमाल केली. गाणी तर त्याने गायलीच पण त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांसोबत तो नाचलाही.
फक्त धमालच नाही तर त्याने सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनही दिलं. त्यांच्या टॅलेण्टचं तोंड भरुन कौतुक करत त्यांना नवं बळ दिलं.
थोडक्यात कपिलची ही घर वापसी साऱ्यांसाठीच मनोरंजनाची धमाकेदार मेजवानी ठरली.