Tharla Tar Mag : स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग (Tharla tar Mag) या मालिकेतील एका कलाकारचं अपघाती निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मालिकेतील गौरव काशिदे याचं वयाच्य अवघ्या 24 व्या वर्षी निधन झालंय. त्याच्या निधनाच्या बातमीमुळे ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनानंतर अभिनेत्री जुई गडकरी हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. जुईच्या ही पोस्ट काळीज पिळवटून टाकणारी आहे. तिने तिच्या या पोस्टमध्ये गौरवविषयीच्या अनेक गोष्टी मांडल्या आहेत. दरम्यान गौरवच्या निधनामुळे संपूर्ण सेटच सुन्न झाला असल्याचंही जुईने म्हटलंय.
जुईची पोस्ट नेमकी काय?
जुईने तिच्या सोशल मीडियवर गौरवचा एका फोटो शेअर केलाय. त्यामध्ये तिने म्हटलं की, गौरवच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तो बाईकवरुन घरी जात होता. 9 तारखेच्या रात्री गौरवच्या बाईकच्या भीषण अपघात झाला. “ताई मला कोणी उठवलंच नाही, म्हणून लेट झाला यायला!” हे त्याचं पहिलं वाक्य होतं आमचं युनिट जॅाईन केल्यावर! पहिल्याच दिवशी लेट आला होता तो! मग रुळत गेला हळुहळु. सिनचे que देताना जर तो कलाकार पळत आलेलं असेल तर तो पळून पण दाखवायचा. हुषार होता. मला रोजचे सिन Explain करायचा. हसतमुख होता. मेहनती होता. त्या वयात मुलं असतात, तसा अल्हड पण होता. मला थोडा घाबरायचा म्हणून ''ताईसमोर स्मोक करुन गेलं की, ताई लगेच ओळखते आणि ओरडते, त्यापेक्षा नाही करत स्मोक”, असं म्हणून निदान तेवढ्यापुरतं तरी टाळायचा, गुणी मुलगा होता.''
पुढे तिने म्हटलं की, ''रात्री घरी जाताना आमच्या दुसऱ्या एका महिला असिस्टंट डायरेक्टरला आणि हेअर ड्रेसरला घरी सोडून जायचा. त्या ही रात्री तो त्या दोघींना चारकोपला सोडून पुढे गेला. त्या दिवशी नेमकी आमची हेअर ड्रेसर चारकोपलाच उतरली, नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहिमपर्यंत जायची आणि तो तिला न्यायचं म्हणून गाडी सांभाळून चालवायचा. त्याचा 24 वा वाढदिवस होता 10 जून ला. 9 तारखेला त्याच्या बाईकचा वांद्रेमध्ये भीषण अपघात झाला, त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता, पण सगळ्यांशी त्याने छान नातं जोडलं होतं. गेले अनेक दिवस तो Coma मध्ये होता आणि काल त्याची मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली. सेटवर सगळे अजूनही सुन्न आहेत. सगळ्यांना वाटत होतं गौरव परत येईल. गौरव, काल पण तुला कोणीतरी उठवायला हवं होतं रे. तू लेट आला असतास, पण आला तरी असतास. तुझ्या आत्म्याला शांती मिळो, हे तरी कसं लिहायचं? त्या आई-बाबांचं आज काय झालं असेल, याचा विचारही करु शकत नाही.''