इंडियन आयडलच्या बाराव्या पर्वाचे व्यासपीठ गाजवून आपल्या सुरेल स्वरांनी करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवणारी गायिका सायली कांबळेच्या स्वप्नवत प्रवासाला आता सुरूवात झालीय. सायलीचे इंडियन आयडल संपताना सिनेसृष्टीत पदार्पण करायचे स्वप्न पूर्ण झाले. फिल्ममेकर जो राजन दिग्दर्शित 'कोल्हापूर डायरीज' ह्या चित्रपटासाठी सायलीने नुकतेच गाणे गायले.


सुमधूर गळ्याची गायिका सायली कांबळे म्हणते, “मला विश्वासच बसत नाही आहे, की माझं स्वप्न पूर्ण झालंय. इंडियन आयडलमध्ये जाण्याचं कारणचं होतं, लोकांनी मला ओळखावं आणि माझं संगीत क्षेत्रात करीयर सुरू व्हावं. इंडियन आयडलचा ग्रँड फिनाले झाल्याझाल्या हातात काम असणं, हे भाग्याचं आहे. लहानपणापासून अवधूत गुप्तेंची मी चाहती आहे. आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळतेय. चित्रपटाचे दिग्दर्शक जो राजन ह्यांनी मला ही संधी दिली ह्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे.”


जो राजन दिग्दर्शित कोल्हापूर डायरीजच्या ह्या गाण्याला अवधूत गुप्तेनी संगीत दिलंय. स्वप्नील बांदोडकर आणि सायली कांबळे ह्यांनी हे रामँटिक गाणं गायलंय. जे लवकरच गायत्री दातार आणि भुषण पाटील ह्यांच्यावर चित्रीत होणार आहे.


फिल्ममेकर जो राजन म्हणाले, “सायलीच्या गळ्यात जादु आहे. तिचा इंडियन आयडलचा संगीत प्रवास मी गेले कित्येक महिने पाहिलाय. त्यामुळेच मला तिचा अभिमान आहे. ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुलीला मराठी फिल्मसाठी ब्रेक देताना मला खूप आनंद होतोय.”


संगीतकार, गायक, फिल्ममेकर अवधूत गुप्ते म्हणतात, “आमचे दिग्दर्शक जो राजन ह्यांना सायलीचा आवाज खूप आवडला होता. त्यामुळे त्यांनीच मला सायलीचे नाव ह्या गाण्यासाठी सुचवले. ती किती उत्तम गायिका आहे, ते ती दरवेळी सिध्द करते. सायलीच्या रूपाने एक टॅलेंटेड गायिका महाराष्ट्रालाच नाही तर अख्या जगाला मिळालीय, असं मला वाटतं.”


पवनदीप इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनचा विजेता


पवनदीप राजननं इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. तर अरुणिता कांजीलाल शोची फर्स्ट रनरअप ठरली. दानिश खान, शनमुखप्रिया, अरुणिता कांजीलाल निहाल तोरो, सयाली कांबळे आणि पवनदीप राजन इंडियन आयडलचे फायनलिस्ट होते. गायक अनु मलिक, सोनू कक्कड आणि हिमेश रेशमिया यांच्या उपस्थितीत शोचा विनर निवडण्यात आला.