मुंबई : नाटकादरम्यान काही प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असतात, त्यामुळे इतर सुज्ञ प्रेक्षक आणि मंचावरील कलाकारांची एकाग्रता भंग होते. प्रेक्षकांच्या या वागण्यामुळे आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाट्य कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. त्यात आता अभिनेता सुबोध भावे याची भर पडली आहे.


नाटकादरम्यान ज्या प्रेक्षकांचे मोबाईल वाजतात, जे प्रेक्षक मोबाईल वापरत असतात त्यांच्यावर सुबोध भावे संतापला आहे. नाटकादरम्यान प्रेक्षकांचे मोबाईल असेच वाजत राहणार असतील तर मी नाटकात काम करणार नाही, असा इशारा सुबोधने दिला आहे.

सुबोध सध्या विविध ठिकाणी 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचे प्रयोग करत आहे. नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनेकदा प्रेक्षकांचे मोबाईल फोन वाजून नाटकादरम्यान व्यत्यय येत येतो. त्यामुळे सुबोध सध्या प्रेक्षकांवर संतापला आहे. त्याने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सुबोधने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, अनेक वेळा सांगून, विनंती करुनही जर नाटक सुरु असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा प्रेक्षकांना नाटक संपूर्ण एकरुप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यापुढे नाटकात काम न करणं हा एकमेव उपाय आहे. म्हणजे त्यांच्या (प्रेक्षकांच्या) फोनमध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा आहे. नाटक काय टीव्हीवर सुद्धा पाहता येईल.