मुंबई : जगप्रसिद्ध 'फोर्ब्ज' मासिकाने मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या नाटकांची दखल घेतली आहे. 'संगीत देवबाभळी' हे भारतात अत्यंत लोकप्रिय नाटकांपैकी एक असल्याचं 'फोर्ब्ज'मध्ये म्हटलं आहे.

जागतिक नाट्यकलेवर आधारित लेखामध्ये 'संगीत देवबाभळी'चा गौरव करण्यात आला आहे. रखुमाई आणि संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली यांच्यातील हृद्य संवाद रसिकांसमोर मांडणाऱ्या 'संगीत देवबाभळी' नाटकाची कीर्ती सातासमुद्रापार पोहचली आहे.

प्राजक्त देशमुख लिखित-दिग्दर्शित या संगीत एकांकिकेने सुरुवातीला एका स्पर्धेच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवलं होतं. लेखकासोबत शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांच्या अभिनयाचीही तारीफ करण्यात आली आहे.

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'अमर फोटो स्टुडिओ', 'इंदिरा', 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला', 'वाडा चिरेबंदी' या नाटकांचंही 'फोर्ब्ज' मासिकात कौतुक करण्यात आलं आहे. वेगवेगळेविषय मांडण्यासाठी मराठी रंगभूमी सक्षम होत चालली असून कक्षा रुंदावत असल्याचे गौरवोद्गारही 'फोर्ब्ज'ने काढले आहेत.