मुंबई : प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते नरेंद्र झा यांचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी आहे. पालघरमधील फार्म हाऊसवर हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. नरेंद्र झा 55 वर्षांचे होते.


शांती मालिकेतून नरेंद्र झा यांनी करिअरला सुरुवात केली. झी टीव्हीवरील 'रावण' मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. रावणाच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांचा चेहरा घराघरात पोहचला. क्योंकि सास भी कभी बहू थी, संविधान, बेगुसराय, चेहरा यासारख्या जवळपास 20 मालिकांतही ते झळकले.

'घायल वन्स अगेन' चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक प्रचंड गाजला होता. याशिवाय हैदर, रईस, हमारी अधुरी कहानी, काबिल, मोहंजोदारो, शोरगुल, फोर्स 2, फंटूश यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. आगामी साहो चित्रपटातही ते अभिनय करणार होते.

काहीच दिवसांपूर्वी नरेंद्र यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर ते मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे आराम करण्यासाठी ते पालघरच्या वाडामध्ये असलेल्या फार्म हाऊसवर गेले होते. नरेंद्र यांना बुधवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.


नरेंद्र झा यांनी 1992 मध्ये एसआरसीसीमध्ये अभिनयाचा डिप्लोमा कोर्स केला होता. नेहरु विद्यापीठात त्यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. मात्र अभिनयाच्या ओढीने त्यांनी दिल्ली सोडून मुंबईची वाट धरली. मुंबईत आल्यावर त्यांना मॉडेलिंगच्या अनेक ऑफर्स आल्या.