Dnyaneshwar Mauli: 'ज्ञानेश्वर माउली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूपदर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं.  प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका संताचा प्रवेश होणार आहे. 


संतांच्या या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली. संत चोखामेळा यांची कथाही प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना ती भावली आहे. आता मालिकेत संत नामदेव यांचा प्रवेश होणार आहे. माउली आणि नामदेव यांची भेट कशा प्रकारे होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. संत नामदेव यांची भूमिका अवधूत गांधी साकारणार आहेत. अवधूत गांधी हे वारकरी संप्रदायातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. ते ज्ञानेश्वर माउली मालिकेचा  सुरुवातीपासूनच भाग आहेत. याविषयी  त्यांचा अभ्यास फार महत्त्वाचा  आहे. त्यांच्या या  वेशाची/पेहेरावाची प्रेक्षकांमध्ये  चर्चा होईल, यात शंकाच नाही. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माउली यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी  उत्कंठा वाढवणारे असेल. 


अवधूत गांधी यांनी पोस्ट शेअर करुन या मालिकेबद्दल सांगितलं. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि श्री सद्गुरू नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या "ज्ञानेश्वर माऊली" या लोकप्रिय मालिकेत संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या भूमिका करण्याचे सौभाग्य लाभले. रामकृष्णहरी ' 






संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नामदेव यांचा प्रवास  'ज्ञानेश्वर माउली'  या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Marathi Serial : 'फुलाला सुगंध मातीचा' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; 'आई कुठे काय करते' पडली मागे