नाशिक : कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा 'मराठी बिग बॉस' हा रिअॅलिटी शो वादात सापडला आहे. बिग बॉसमधील स्पर्धक अभिनेत्री रेशम टिपणीस आणि अभिनेता राजेश शृंगापुरे यांच्याविरोधात अश्लील वर्तन केल्याप्रकरणी नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.


ऋषिकेश बळवंत देशमुख यांनी बिग बॉसविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांचे संवाद आणि वर्तन मर्यादेचं उल्लंघन करणारे असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.


14 मे रोजी चॅनल सर्फिंग करताना कलर्स मराठीवर 'बिग बॉस' शो सुरु होता. शो ची सध्या जोरदार चर्चा सूर आहे, त्यामुळे कुटुंबांसह बिग बॉस बघत असताना दोन्ही कलाकारांचे प्रेमाचे संवाद आणि आक्षेपार्ह वर्तन सुरु झाले. दोघे विवाहित असताना त्यांचं वर्तन विवाहबाह्य संबंधाना खतपाणी घालणारं आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

त्यामुळे संबंधित चित्रफितीची चौकशी व्हावी, तसं कलर्स वाहिनीचे संचालक, निर्माते आणि दोन्ही कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात ऋषिकेश देशमुख यांनी पोलिस आयुक्तांचीही भेट घेतली आहे. ऋषिकेश देशमुख हे कायद्याचं शिक्षण घेत आहेत.