Aai Tulja Bhavani Serial Complete 100 Episodes : कलर्स मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या आई तुळजाभवानी या मालिकेनं आपला 100 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेनं महाराष्ट्रातील लोकांच्या मनात अल्पावधीतच एक अढळ स्थान निर्माण केलं. महाराष्ट्रातून वाढता प्रतिसाद आणि प्रेक्षक मायबाप यांच्या आशीर्वादामुळे मालिकेनं आपले 100 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. अनेक असुरांचा संहार करत वेळोवेळी भक्तांचं रक्षण देवीनं कसं केलं,महिषासूर आणि देवीचं चाललेल प्रदीर्घ काळ युद्ध नेमकं कसं लढलं गेलं? दैत्यमाता दीतीची महत्वाकांक्षा नेमकी काय होती? ही आजवर माहीत नसलेली गोष्ट उलगडणार आहेच, पण त्याच बरोबर देवीला पृथ्वीतलावर साथ देणारे महादेव आणि पृथ्वीवर भक्त कल्याणात रममाण झालेली तुळजारुपातली पार्वती माता यांचे पतीपत्नीचे गोड गंमतीदार नातंही पाहायला मिळत आहे.
कधीच आई होऊ शकणार नाही, हा देवी पार्वतींना असलेला शाप, ते त्यांचा "जगदजननी" जगन्माता हा सगळ्या विश्वाचे आईपण जपणारा प्रवास प्रत्यक्ष महादेवांना ही भावनिक करणारा होता. या शापाची आणि आईपणाची ही फारशी माहीत नसलेली मायेची गोष्ट या महागाथेची उत्सुकता वाढवणारी आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ची कधी ना पाहिलेली महागाथा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. आई तुळजाभवानी मालिकेत तुळजाभवानीच्या रूपात दिसत आहे, अभिनेत्री पूजा काळे आणि महादेवाच्या रूपात आहे, अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र.
मालिकेचं गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कोल्हापूरमध्ये शूटिंग सुरू आहे. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवीची गाथा प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आली आहे, अशीच या माध्यमातून आई तुळजाभवानीची सेवा आमच्याकडून घडत राहो अशी इच्छा मालिकेची निर्माते आणि दिग्दर्शक शशांक शेंडे यांनी व्यक्त केली आहे.
मला ही भूमिका मिळाली, हे माझं भाग्यच आहे, माझ्या ध्यानीमनी नव्हतं, मी कथ्थक डांसर असल्यानं माझे काही सोशल मीडियावरचे व्हिडीओ संबंधित लोकांनी पाहिल्यावर मला मेसेज आला आणि या भूमिकेविषयी विचारलं, तेव्हा भेटल्यावर त्यांना मी स्पष्ट बोलले की, माझा अभिनय प्रांत नाहीये. तर हे कसं मी निभावू शकते? त्यांनी एक विश्वास दिला की, तुम्ही करू शकता आणि काही सराव केल्यानंतर या गोष्टी जमल्यानं आज तुमच्या समोर उभी आहे. मला विश्वास बसत नाही की मी ही भूमिका करते बहुदा आई तुळजाभवानीच्या मनात असेल की, ही माझ्याकडून सेवा घडावी, असं मत मालिकेतील मुख्य अभिनेत्री पूजा काळेनं मांडलं आहे.
दरम्यान, ही मालिका रोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर लोकांच्या भेटीस येत आहे आणि इथून पुढे सुद्धा असेच आपले प्रेम या मालिकेवर राहू दे, असं आवाहन मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी केलं आहे.