Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यासाठी चॅनेल्सकडून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या जात आहेत. तर, सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात ट्वीस्ट आणले जात आहे. टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा आघाडीवर येण्यासाठी 'कलर्स मराठी'ने चांगलीच कंबर कसली आहे. 'बिग बॉस मराठी'नंतर (Bigg Boss Marathi New Season) आता 'कलर्स मराठी' (Colors Marathi) आता नव्या मालिकांचा धडाका लावला आहे. 'कलर्स मराठी'ने आपल्या लूकमध्येही बदल केला आहे.
दिग्दर्शक असलेले केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी काही महिन्यांपूर्वी 'कलर्स मराठी'च्या प्रोग्रामिंग हेडची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर आता टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर येण्यासाठी 'कलर्स मराठी'कडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये 'भाऊच्या धक्क्या'वर रितेश देशमुखने 'कलर्स मराठी'च्या नव्या लूकचं अनावरण केले. या फ्रेश लूकप्रमाणे काही नवे कार्यक्रम आणि मालिकादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अंगावर शहारे आणणारा महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' मालिकेचा टीझर आऊट झाला आहे. अशातच आता 'कलर्स मराठी'च्या नव्या प्रवासाचा 'दुर्गा' ही नवी मालिकादेखील भाग असणार आहे. या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सुख आणि सूड अशा द्वंद्वात अडकलेली, आपल्या कुटुंबासाठी सर्वकाही पणाला लावून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या दुर्गावर आधारित ही मालिका आहे. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध दुर्गा कशी घेणार हे जाणून घेणे उत्सुकतेचे असणार आहे. दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकणार असून मालिकेचा नायक अभिषेकची भूमिका अंबर गणपुले साकारणार आहे. तसेच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसतकर आणि वृंदा गजेंद्र देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
'दुर्गा' हे पात्र साकारणारी रूमानी खरे म्हणाली ,"मालिकेचं कथानक ऐकल्या क्षणी आवडलं.'दुर्गा' हे पात्र वेगळं आहे. स्वत:ची मतं ठामपणे मांडू शकणारी, स्वत:साठी उभी राहणारी अशी 'दुर्गा' आहे. 'दुर्गा'च्या माध्यमातून चांगल्या माणसांसोबत छान काम करता येत आहे. मुळात कोणतीही गोष्ट उभी राहताना पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत खूप महत्त्वाची असते. सेटवर असणारी सकारात्मकता उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन देते. 'दुर्गा' हे पात्र साकारताना मला मजा येतेय. प्रेक्षकांनादेखील हे पात्र नक्कीच आवडेल, असा विश्वास तिने व्यक्त केला.
नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला...
दरम्यान, याआधी 'कलर्स मराठी'वर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 'अंतरपाट', 'इंद्रायणी' आणि 'सुख कळले' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, 'हसताय ना हसायला पाहिजे', हा कॉमेडी शोदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. मात्र, या शोने ब्रेक घेतला आहे. बिग बॉस मराठीसाठी शोला ब्रेक दिला असल्याची चर्चा सुरू होती.